बीड : १ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींना जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे यासाठी गोळ्या वाटप केल्या जातात. कोरोनामुळे मुले घरात असली तरी ही गोळी देणे आवश्यक आहे. यासाठीच आरोग्य विभागाकडून २१ ते २८ सप्टेंबरदरम्यान ही मोहीम जिल्ह्यात राबविली जात आहे. याचे नियोजनही झाले आहे.
राष्ट्रीय जंतनाशक दिन हा कार्यक्रम मुले व पौगंडावस्थेतील मुला-मुलींसाठी जंताच्या आजाराचा सामना करण्यासाठी २०१५ पासून सुरू केला आहे. मातीतून प्रसार होणाऱ्या कृमींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन जंतनाशक मोहिमेतील अंतर सहा महिन्यांपेक्षा जास्त नसावे. यासाठी वर्षातून दोन वेळा ही माेहीम राबवून शाळा, अंगणवाड्या, महाविद्यालयांमध्ये जाऊन गोळ्यांचे वाटप केले जाते; परंतु गतवर्षीपासून कोरोनामुळे या मोहिमेला अनंत अडचणी आल्या आहेत. त्यामुळेच अंगणवाडी सेविका, आशाताई यांनी घरोघरी जाऊन मुलांना गोळ्या वाटप केल्या होत्या. आता यावर्षीही पूर्ण क्षमतेने शाळा सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे यावेळीही मुलांना घरी जाऊनच गोळ्या वाटप करण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे.
८ लाख गोळ्यांचा साठा
जिल्ह्यात जंतनाशक गोळ्यांचा तुटवडा नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ५ लाख, तर औषधी भांडारमध्ये ३ लाख अशा ८ लाख जंतनाशक गोळ्या उपलब्ध आहेत. २१ तारखेपासून या सर्व गोळ्या वितरित करून मुलांना दिल्या जाणार आहेत. ज्या मुलांना गोळ्या मिळाल्या नाहीत, त्यांनी आशाताई, अंगणवाडी सेविका यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
असा आहे औषधांचा मात्रा
१ ते २ वर्ष - अर्धी गोळी (अल्बेंडाझोल २०० मि.ग्रॅ.) (पावडर करून व पाण्यात विरघळून घेणे.)
२ ते ३ वर्ष - एक गोळी (४०० मि.ग्रॅ.) (पावडर करून व पाण्यात विरघळून घेणे.)
३ ते ६ वर्ष - एक गोळी (४०० मि.ग्रॅ.) चावून खाण्यास लावणे.
६ ते १९ वर्ष - एक गोळी (४०० मि.ग्रॅ.) चावून खाण्यास लावणे.