पुरुषोत्तम करवा
माजलगाव : सद्यस्थितीत गोशाळा चालवणे जिकरीचे काम झाले आहे. असे असताना माजलगाव येथील कमलबाई रामनिवास मुंदडा गोशाळेत मागील तीन वर्षांपासून गांडूळ खताचा प्रकल्प सुरू केला. याद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नातून गोशाळा चालकास आधार मिळत आहे. त्याचबरोबर, तालुक्यातील शेतकऱ्यांनाही चांगलाच फायदा होऊ लागला आहे.
माजलगाव शहरापासून एक किलोमीटर अंतरावर देवखेडा येथे सिंदफना नदीपात्राशेजारी २००९ मध्ये प.पू. कनकेश्वरी देवीच्या मार्गदर्शनाखाली व राधाकृष्णजी महाराज जोधपूरवाले यांच्या प्रेरणेने सात एकर जागेत गोशाळा उभारण्यात आली. त्यापैकी तीन एकर जागेत गायींसाठी इमारत बांधण्यात आली. सध्या या ठिकाणी ३१३ गायी आहेत. गायींना लागणारा चारा व इतर खर्च पाहता, ही गोशाळा चालविणे खूप जिकरीचे काम आहे, परंतु येथील काही गो-सेवक जेव्हा तोटा होईल, त्यात ते वाटा उचलतात.
दरवर्षी या गोशाळेला तोटा होत असल्याने गोशाळा चालविणाऱ्या सदस्यांच्या डोक्यात गांडूळ खतांची संकल्पना आली. या माध्यमातून आपण उत्पन्न वाढवू शकतो, असे लक्षात आल्याने या ठिकाणी तीन वर्षांपूर्वी गांडूळ खताच्या निर्मितीस सुरुवात करण्यात आली. पाहता-पाहता गांडूळ खत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तयार होऊन त्याची विक्रीही चांगल्या पद्धतीने होऊ लागली. यामुळे या प्रकल्पाला राधेय गांडूळ खत प्रकल्प, असे नाव देण्यात आले.
या ठिकाणी सध्या २४ ट्रेच्या माध्यमातून खत तयार करण्यात येतो. ५५ दिवसांत २४ टन गांडूळ खत तयार होतो. या खताला टनाला ८ हजार रुपयांचा भाव मिळू लागला. या खताला पश्चिम महाराष्ट्रातून चांगली मागणी येऊ लागली.
या गांडूळ खतासोबतच हा खत तयार करताना, त्यातून वर्मीवाॅश हे काढण्यात येते. हे वर्मीवाॅश गांडुळाच्या मूत्रापासून मिळते. एका ट्रेला ५०-५५ लीटर वर्मीवॉश निघते. हे वर्मीवॉश शेतकरी फळबाग व इतर पिकांवर फवारणीसाठी घेऊन जातात. या वर्मीवॉशलाही चांगला भाव मिळू लागला असल्याची माहिती येथील गोसेवक कल्याण गुंजकर यांनी दिली.
------
जमिनीचा पोत सुधारतो
खतात १०० टक्के बॅक्टेरिया असल्याने
शेतात गांडूळ खत टाकल्यास शेत भुसभुशीत होऊन जमिनीचा पोत सुधारतो. यामुळे या शेतातील पिकांना इतर खते टाकायची गरज पडत नाही. यामुळे पीकही जोमात येऊन उत्पन्न चांगले मिळते.
-सिद्धेश्वर हजारे, कृषी अधिकारी, पंचायत समिती, माजलगाव
----------
चारादान पण चर्चा, प्रसिद्धी नाही
या गोशाळेला अनेक जण गुप्तपणाने चारा पाठवत असतात, तर अनेक जण आपल्या वाढदिवसानिमित्त इतर खर्च करून गोशाळेला मदत करतात. यामुळे ही गोशाळा सुरुवातीस ‘ना नफा, ना तोटा...’ या तत्त्वावर चालत असे, परंतु कालांतराने गायींची संख्या वाढल्याने खर्च वाढला. यामुळे दरवर्षी तोटा होऊ लागला. यामुळे आम्ही गांडूळ खताची निर्मिती सुरू केली.
- राजगोपाल उर्फ मुन्ना बाहेती, व्यवस्थापक.
---------
पश्चिम महाराष्ट्रातून मागणी
गोशाळेच्या वतीने तयार करण्यात येणाऱ्या गांडूळ खताला पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात मागणी आहे, तरीही आम्ही हे खत केवळ तालुक्यातील शेतकऱ्यांना विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.
- जुगलकिशोर भुतडा, अध्यक्ष, कमलबाई रामनिवास मुंदडा गोशाळा, देवखेडा.
280821\28bed_5_28082021_14.jpg~280821\28bed_4_28082021_14.jpg
गांडूळ खत पकल्प १~गांडूळ खत पकल्प २