बीड : जिल्हा पोलीस दलातील वाहनांचे टायर झिजून खराब झाले आहेत. कालबाह्य झालेल्या टायरवरच पोलिसांची वाहने धावत आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. दरम्यान, जिल्हा पोलीस दलाने केेलेल्या मागणीच्या तुलनेत टायरचा पुरवठा कमी असल्याने चालक पोलिसांना कसरत करावी लागत आहे.
जिल्ह्यात २८ पोलीस ठाणी असून दुचाकी व चारचाकी मिळून चारशेपेक्षा अधिक वाहने उपलब्ध आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ठाणेप्रमुख तसेच विविध शाखा आणि विशेष पथके या सर्वांना वाहने पुरविली जातात. दैनंदिन गरजेनुसारदेखील वाहनांची उपलब्धता करावी लागते. मात्र, बहुतांश वाहनांना दोन ते तीन वर्षे उलटूनही नवीन टायर मिळालेले नाहीत. त्यामुळे चालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, पोलिसांच्या वाहनांचे चालू वर्षी तीन तर मागील वर्षी चार अपघात झाले. यात काही अधिकारी व अंमलदार जखमी झाले होते. अपघाताची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पोलीस दलातील वाहने सक्षम असणे गरजेचे आहे, परंतु खराब टायरमुळे पोलिसांच्या तत्काळ प्रतिसादाला ‘ब्रेक’ लागण्याची शक्यता आहे. पोलीस दलाच्या मोटार परिवहन विभागात टायरसोबत इतर दुरुस्ती साहित्यांचीही वानवा आहे. त्यामुळे अनेक चालकांना पदरमोड करावी लागत असल्याची माहिती आहे.
....
पोलीस दलातील वाहनांची संख्या १६७ दुचाकी २६५ चारचाकी
.....
मागणी शेकड्यात, मिळाले फक्त ५० टायर
जिल्हा पोलीस दलातील मोटार परिवहन विभागाने टायरची शेकड्यांमध्ये मागणी नोंदविलेली आहे. प्रत्यक्षात केवळ ५० टायर मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले. टायर पुरवठ्यासाठी गृह विभागाने राज्यस्तरावर निविदा काढून कंत्राटदार नेमलेला आहे. मात्र, मागणीपेक्षा कमी टायर उपलब्ध होत असल्याने अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
.....
नियंत्रण सुटण्याची भीती
कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास किंवा कोठे अनुचित प्रकार घडल्यास पोलिसांना तत्काळ घटनास्थळी पोहोचावे लागते. शिवाय रात्री- अपरात्री पोलिसांना वाहनांमधून गस्त घालावी लागते. मात्र, टायर खराब असल्याने वाहनांवरील नियंत्रण सुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
....
पोलिसांच्या वाहनांसाठी नवीन टायरची मागणी नोंदवलेली आहे. पहिल्या टप्प्यात काही टायर मिळाले असून अजून काही मिळणार आहेत. लवकरच अडचण दूर होईल.
- राजेंद्र तावरे, पोलीस निरीक्षक, मोटार परिवहन विभाग, बीड