माजलगाव (बीड) : पावसाळा सुरु होऊन दिड महीना उलटला तरीही धरणक्षेञात दमदार पाऊस न झाल्याने माजलगाव धरणात केवळ २ % उपयुक्त जलसाठा राहिला आहे. यामुळे धरण क्षेत्रावर अवलंबून नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.
तालुक्यात जूनच्या सुरुवातीला मान्सूनपूर्व पाऊस झाला होता. यामुळे पुढे चांगला पाऊस पडण्याची आशा होती. मात्र त्यानंतर तालुक्यात मोठा पाऊस झाला नाही. यासोबतच माजलगाव धरण क्षेत्रात अत्यंत अल्प पाऊस झाला. यामुळे धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने घट होत आहे.
या धरणातुन बीड, माजलगाव शहरासह, 11 खेड्यांना पाणी पुरवठा होतो. या पूरवठ्यासह पाण्याचे बाष्पीभवनही मोठ्या प्रमाणात होत असल्याने पाणी पातळीत दिवसेंदिवस घट होत असून धरणात केवळ 2.24 % एवढाच उपयुक्त पाणी साठा शिल्लक आहे. शनिवार रोजी धरणात एकुण पाणी साठा 149 दलघमी एवढा असून मृत साठा 142 दलघमी असा तर धरणात केवळ 7 दलघमी एवढा जिवंत पाणी साठा उपलब्ध आहे. यातच धरणातुन विना परवाना पाणी उपसा जोमाने सुरु आहे. याचासुद्धा परिणाम पाणी पातळीवर होत आहे. याकडे शासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.