- सोमनाथ खताळ
बीड : मागील तीन वर्षांत महाराष्ट्रात तब्बल ६ लाख ५९ बालकांचे ‘हृदय’ आजारी असल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही पूर्ण झाल्या आहेत. राज्य कुटूंब कल्याण केंद्राच्या सांख्यिकी विभागाने नुकताच आर्थिक पाहणी अहवाल सादर केला असून त्यातून हा आकडा समोर आला आहे. तसेच ४६ लाख २६३ बालकांवर छोट्या-मोठ्या इतर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत वर्षातून दोन वेळा अंगणवाडी व एक वेळ शाळकरी मुलांची आरोग्य तपासणी केली जाते. यामध्ये ० ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. २०१७ ते डिसेंबर २०१९ पर्यंतचा आर्थिक पाहणी अहवाल नुकताच सादर झाला. दर वर्षी ८० हजार शाळा आणि १ लाख अंगणवाड्यांमध्ये जावून तपासणी करण्यात आली. तीन वर्षांत शाळेतील ३ कोटी २३ लाख ४७ हजार तर अंगणवाडीतील ३ कोटी ५४ लाख ३७ हजार बालकांची तपासणी केली आहे. पैकी शाळेतील २६ लाख ८४ हजार आणि अंगणवाडीतील २७ लाख ५२ हजार बालकांवर उपचार केले आहेत. पथकाला जागेवरच उपचार न झाल्याने शाळेतील ३ लाख १३ हजार तर अंगणवाडीतील ३ लाख ९२ हजार बालकांना ग्रामीण, उपजिल्हा, जिल्हा रुग्णालयात रेफर केल्याचे सांगण्यात आले.
या तपासणीसाठी विशेष पथके नियुक्त केलेले असून एका पथकात एक पुरुष व एक महिला वैद्यकीय अधिकारी, एक औषध निर्माता, एक नर्स यांचा समावेश असतो. दरम्यान, हाडाचे आजार, अॅन्डेसिन्टेड टेस्टिज, अंडवृद्धी, हार्निया, अपेंडिक्स, ओठ दुभंगणे, डोळे, दात, कान-नाक-घसा, कॅन्सर, किडणी, न्यूरल ट्यूब डिफेक्ट व इतर अशा ४६ लाख ३६३ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. तर पेटेंट डक्टस अर्टेरिओसस, व्हेंट्रीकुलर सेफ्टल डिफेक्ट, अॅट्रीयल सेफ्टल डिफेक्ट, डेक्स्ट्रो कारडीयाक, ट्रंकस अर्टेरिओसस यासारख्या हृदयाच्या ६ लाख ५९ शस्त्रक्रिया केल्या आहेत. या शस्त्रक्रिया महात्मा फुले जीवनदायी जन आरोग्य योजना व मुख्यमंत्री सहायता निधी किंवा इतर ट्रस्टच्या माध्यमातून केल्या जात आहेत.
बीडमध्ये ६२ शस्त्रक्रियाबीड जिल्ह्यात एप्रिल २०१९ ते जानेवारी २०२० पर्यंत ५ लाख ९६ हजार १५७ बालकांची तपासणी केली आहे. यात ६२ बालकांवर हृदयशस्त्रक्रिया झाल्या आहेत. तर ९४० बालकांवर इतर शस्त्रक्रिया झाल्याची माहिती शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली. समन्वयक म्हणून आर. के. तांगडे हे काम पाहत आहेत.
तीन वर्षांतील आकडेवारी (लाखांत)वर्षे तपासलेले उपचार संदर्भित हृदय आणि इतर केलेले केलेले संबंधित शस्त्रक्रिया शस्त्रक्रिया२०१७-१८ २४२.८५ १८.३२ १.८५ १.८३६ १५.२५५२०१८-१९ २४९.५ २०.५९ २.९४ २.६१४ १७.६३८डिसें. २०१९ पर्यंत १८५.४९ १५.४५ २.२६ १.६०९ १३.३७०एकूण ६७७.८४ ५४.३६ ७.०५ ६.०५९ ४६.२६३