बीड : पाचवी ते आठवीदरम्यानच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू होत आहेत. त्या अनुषंगाने शिक्षकांची कोरोना चाचणी केली जात आहे. शुक्रवारी ४६६ जणांची ॲन्टिजन केली असता १७ शिक्षक पॉझिटिव्ह आले. अद्यापही आरटीपीसीआरद्वारे चाचणी केलेल्या २१४ अहवालांची प्रतीक्षा असून ते शनिवारी येणार आहेत. शिरूर तालुक्यात सार्वाधिक ११ शिक्षक बाधित आढळले आहेत.
कोरोनाकाळात शाळा, महाविद्यालये बंद होते. अगाेदर ९ ते १२ पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले तेव्हाही सर्व शिक्षक, प्राध्यापकांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक केले होते तेव्हा तब्बल ५०० पेक्षा जास्त शिक्षक बाधित आढळले होते. आता तसेच पाचवी ते आठवीपर्यंत शाळा सुरू होत आहेत. पूर्वीप्रमाणेच शिक्षकांची कोरोना चाचणी केली जात आहे. आतापर्यंत ४६६ ॲन्टिजेन तर २१४ आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. पैकी ॲन्टिजेनमध्ये १७ शिक्षक बाधित आढळले असून आरटीपीसीआरचे २१४ अहवाल शनिवारी येणार आहेत.
दरम्यान, पॉझिटिव्ह शिक्षकांमध्ये शिरूर ११, बीड ५, आष्टी १ येथील शिक्षकांचा समावेश आहे. अंबाजोगाई, माजलगाव आणि परळी तालुक्यात अद्याप या चाचण्यांना सुरूवात झाली नसल्याचे दिसते. शनिवारपासून येथेही सुरू होण्याची शक्यता आहे.
पालकांच्या मनात धाकधूक
जिल्ह्यातील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असली तरी आता शिक्षक पॉझिटिव्ह आल्याने मुलांना शाळेत पाठविण्याबाबत पालक द्विधा मनस्थितीत आहेत. त्यांच्या मनात भीती असल्याचे जाणवत आहे. अनेक पालकांनी याबाबत आपली भावनाही व्यक्त केली.
कोट
आतापर्यंत ॲन्टिजेनच्या ४६६ चाचण्या केल्या असून त्यात १७ शिक्षक पॉझिटिव्ह आले आहेत. आरटीपीसीआरच्या २१४ चाचण्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.
डॉ. आर. बी. पवार
जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड