बीड : जिल्ह्यात बाधित रुग्णांची संख्या घटत असल्याने दिलासा मिळत असला तरी मृत्युदर कमी होत नसल्याने चिंता वाढली आहे. मंगळवारी आणखी पाच मृत्युची नोंद झाली. तसेच ३१ नवे रुग्ण आढळले तर ३६ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले.
जिल्ह्यातील कोरोनाचे मृत्यू रोखण्यात प्रशासन व आरोग्य विभाग पूर्णपणे अपयशी ठरत असल्याचे दिसत आहे. राज्य आणि देशाच्या तुलनेत बीड जिल्ह्याचा मृत्युदर दुप्पट आहे. ते थांबविण्यासाठी प्रशासनाकडून केलेल्या उपाययोजना फोल ठरत आहेत. मंगळवारी आणखी पाच मृत्युची नोंद झाल्याने मृत्युदर ३.१७ टक्के एवढा झाला आहे. यामध्ये आष्टी तालुक्यातील कडा येथील ७५ वर्षीय महिला, बीड तालुक्यातील मुगगाव येथील ७० वर्षीय पुरूष, केज तालुक्यातील सादोळा येथील ६५ वर्षीय पुरूष, माजलगाव तालुक्यातील खरात आडगाव येथील ५५ वर्षीय पुरूष, आष्टी शहरातील ५० वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. आता एकूण मृत्युसंख्या ५०७ एवढी झाली आहे. तसेच मंगळवारी ३६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आता एकूण आकडा १५ हजार २ एवढा झाला आहे. दरम्यान, मंगळवारी ७९४ लोकांची चाचणी करण्यात आली. यातील ७६३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर ३१ पॉझिटिव्ह आले. यात अंबाजोगाई ६, आष्टी ८, बीड ८, माजलगाव १, परळी ७, शिरूर १ यांचा समावेश आहे. आता एकूण बाधितांचा आकडा १५ हजार ९७९ एवढा झाला आहे.
दिलासा, शिक्षकांत नवा रुग्ण नाहीआतापर्यंत जिल्ह्यातील १० हजार ७१७ शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यातील ११२ शिक्षक कोरोना बाधित आढळले आहेत. मंगळवारी नव्याने एकही शिक्षक बाधित न आढळल्याने दिलासा मिळाला आहे. अद्यापही ५३ अहवाल प्रलंबित आहेत.