बीड : जिल्ह्यात आतापर्यंत ५९८ लोकांचा कोरोनाने जीव घेतला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर २.८४ टक्के एवढा आहे. यात केज तालुक्याचा मृत्युदर सर्वाधिक ४.६ टक्के एवढा आहे. तसेच सर्वात मोठा तालुका असणाऱ्या बीडचा मृत्युदर २.३२, तर अंबाजोगाईचा ३.७६ टक्के एवढा आहे. मृत्युदर कमी होत नसल्याने चिंता वाढली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत २१ हजार ४५८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. पैकी १९ हजार ७३६ कोरोनामुक्त झाले असून, ५९८ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सुरुवातीपासूनच आरोग्य विभागाला कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यात अपयश आलेले आहे. आरोग्य विभागाने प्रत्येक मृत्यूचे ऑडिट करणे बंधनकारक असून, त्यावर आधारित उपाययोजनाही करणे गरजेचे आहे. परंतु आठवड्यापूर्वीच खुद्द अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड यांनी २० टक्के डेथ ऑडिट बाकी असल्याची कबुली दिली होती. यावरून आरोग्य विभाग कोरोनाबाबत किती गाफिल आहे, याची प्रचिती येते. यामुळेच राज्याच्या तुलनेत बीडचा मृत्युदर दुप्पट असल्याचे दिसते.
दरम्यान, जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यू हे बीड तालुक्यात आहेत. तब्बल १५० मृत्यूची नोंद आरोग्य विभागात आहे. केज तालुक्यात आतापर्यंत केवळ ५६ मृत्यूची नोंद असली तरी एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेतील मृत्युदर हा सर्वाधिक आहे. सर्वात कमी १.५१ मृत्युदर हा वडवणी तालुक्याचा आहे.
तालुकानिहाय मृत्युदराची आकडेवारी
तालुका रुग्णसंख्या मृत्यूटक्का
अंबाजोगाई २८९७ १०९ ३.७६
आष्टी २१०४ ४७ २.२३
बीड ६४८१ १५० २.३१
धारूर ८९७ ३१ ३.४६
गेवराई १२१६ ४२ ३.४५
केज १३८० ५६ ४.६
माजलगाव १५९५ ४५ २.८२
परळी २२५३ ६४ २.८४
पाटोदा ६६२ २५ ३.७८
शिरुर ८०९ १६ १.९८
वडवणी ६६४ १० १.५१