- नितीन कांबळे कडा (बीड): आष्टी तालुक्याचा भूमिपुत्र वाकी गावातील तरुण प्रज्वलित गौतम ससाणे याने महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कळसूबाई गडाची चढाई अवघ्या ४१ मिनिट ५४ सेकंदात पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे. कोरगाव -भीमा येथील १ जानेवारी रोजी शौर्यदिनाचे औचित्यसाधून प्रज्वलित याने हे शिखर सर करण्याची मोहीम फत्ते केली.
अत्यंत अतिशय कठीण चढाई, अरूंद गुंतागुंतीचा मार्ग यासाठी कळसूबाई गड ओळखला जातो. १ जानेवारी रोजी कोरेगाव-भीमा येथे शौर्यदिन साजरा करण्यात येतो. येथे विजयस्तंभाचे दर्शन घेतल्यानंतर प्रज्वलित टॉपर ट्रॅकर्स ग्रुपमधील साथीदारासह गडाकडे रवाना झाला. कळसूबाई हा अत्यंत कठीण गड त्याने अवघ्या ४१ मिनिटं व ५४ सेकंदामध्ये सर केला. यापूर्वी साजन भांगरे याने ४२ मिनिटांमध्ये गड सर केला होता.
आता प्रज्वलित हा सर्वात जलद गतीने कळसूबाई शिखर सर करणारा ठरला आहे. यापुढेही दरवर्षी कोरेगाव-भीमा येथे शौर्यदिन साजरा करून कळसूबाई शिखर सर करण्याचा संकल्प प्रज्वलितने केला आहे. त्याने आतापर्यंत विविध ठिकाणावरील ४० किल्ले सर केले आहेत. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.