दरवर्षी कऱ्हेवडगांव येथील मलिक साहेब यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होत असतो. सर्वधर्मीय भाविक हजारोंच्या संख्येने या उत्सवात सहभागी होत असतात. गावातील ग्रामस्थ बाहेरील शहरामध्ये नोकरी, व्यवसाय, व्यापार करण्यासाठी गेलेले वर्षामध्ये एकदाच या यात्रा उत्सवासाठी कुटुंबासमवेत येत असतात. यात्रा उत्सव दोन दिवस चालतो. ग्रामस्थांच्या मनोरंजनासाठी सायंकाळी तमाशा व दुसऱ्या दिवशी मल्लांच्या मातीतील कुस्त्यांचा फड रंगत असतो. या यात्रा उत्सवाची गावातील प्रत्येक जण उत्सुकतेने वाट पाहत असतो, परंतु याही वर्षी कोरोनाचे सावट पसरले आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व यात्रा उत्सव, लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम, उरुस, प्रशासनाने रद्द करण्याच्या घेतलेल्या निर्णयाला प्रतिसाद देत कऱ्हेवडगांव येथील ग्रामस्थांनी मलिक साहेब यात्रा उत्सवातील कार्यक्रम रद्द केले आहेत. सरपंच वंदनाताई गायकवाड, उपसरपंच सुग्रीव नागरगोजे, ग्रामसेवक बी.बी.गाढवे यांनी संचारबंदी व जमावबंदी नियमाचे उल्लंघन होऊ नये म्हणून लाऊडस्पीकरद्वारे सूचना देऊन सर्वांनी दक्षता घेण्याचे आवाहन केले.
गावामध्ये पोलीस उपनिरीक्षक सोनाजी हंबर्डे, पो.शि.ए.एम. इंगळे, होमगार्ड डि.जी. फुंदे,
होमगार्ड वांढरे यांनी भेट देऊन शांतता कमिटीची बैठक घेऊन कोरोनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी सरपंच वंदनाताई गायकवाड, उपसरपंच सुग्रीव नागरगोजे, संजय गायकवाड, हनुमंत गायकवाड, सचिन ससाणे, अमर शेख, संदीप बांगर, निलेश गायकवाड, अंबादास बांगर, दत्तात्रय गावडे, सलवार शेख, बाबूलाल शेख आदी ग्रामस्थ शांतता कमिटीच्या बैठकीत उपस्थित होते.
===Photopath===
160421\img-20210416-wa0393_14.jpg