सोयाबीनचे क्षेत्र वाढणार
अंबाजोगाई : सध्या सर्वत्र कोरोनाची आपत्ती असली तरी या आपत्ती काळातही खरिपाचा हंगाम यशस्वी व्हावा, यासाठी कृषी विभाग पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. कृषी विभागाने यावर्षी ७० हजार ७७९ हजार हेक्टर कृषी क्षेत्रावर खरिपाचे नियोजन केले आहे. यामध्ये सर्वाधिक पेरा सोयाबीनचा गृहीत धरण्यात आला आहे.
गेल्यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान झालेले असल्याने यंदा खरिपाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.
अंबाजोगाई तालुक्यात सुमारे ७० हजार ७७९ हेक्टर क्षेत्र लागवडी लायक आहे. गेल्या वर्षी ५७ हजार १२३ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला होता. मात्र यावर्षी सोयाबीनला मोठा भाव मिळाल्याने सोयाबीनचे क्षेत्र वाढणार आहे. यावर्षी किमान दोन ते तीन हजार हेकटर क्षेत्र वाढणार आहे. दरम्यान गेल्यावर्षी मुबलक प्रमाणात पाऊस झाल्याने यंदाच्या उन्हाळ्यातही जलाशयांमध्ये मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध राहिले.
गेल्यावर्षी लॉकडाऊनमुळे ऐनवेळी बियाणांचा तुटवडा निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर यंदा शेतकऱ्यांनी प्रामुख्याने सोयाबीन या प्रमुख पिकांसाठी घरीच बियाणे काढून ठेवलेले आहे.
संभाव्य पीकपेऱ्यानुसार बियाणांची आवश्यकता पाहता विविध जातीचे नवीन बियाणेही विक्रीसाठी येणार आहे. मात्र, शेतकऱ्यांचा मोठा कल घरचेच बियाणे पेरण्यासाठी वापरणार असल्याचे पुढे आल्याने या वर्षी तुटवडा जाणवणार नसल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे. अंबाजोगाई तालुक्यात या वर्षी उसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाल्याने सोयाबीनव्यतिरिक्त इतर पिकांना जास्त क्षेत्र मिळणार नसल्याचे निदर्शनास येत आहे.
कृषी विभागाच्या वतीने पेरणीपूर्व तयारी करण्यात आली आहे. अनेक शेतकरी घरचे बियाणे वापरणार असले तरी ४५ हजार क्विंटल बियाणे बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्याच प्रमाणे रासायनिक खतांचा तुटवडा होणार नाही. यासाठी खतेही मोठ्या प्रमाणात मागविण्यात आले आहेत.
-आर.डी. बर्वे, तालुका कृषी अधिकारी