अंबाजोगाई - महाराष्ट्राचे शक्तीपीठ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवास शनिवारी सकाळी १० वाजता घटस्थापना व महापूजेने प्रारंभ झाला. तहसीलदार तथा योगेश्वरी देवल कमिटीचे अध्यक्ष संतोष रूईकर व कमल संतोष रूईकर यांनी श्री योगेश्वरी देवीची विधीवत महापुजा केली. दरवर्षी भाविकांच्या प्रचंड गर्दीत होणारा हा नवरात्र महोत्सव मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इनडोअर साजरा होत आहे.
१७ आॅक्टोबर ते २५ आॅक्टोबर या कालावधीत श्री योगेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव साजरा होत आहे. शनिवारी सकाळी मंदिरात घटस्थापना व महापुजेने महोत्सवास प्रारंभ झाला. तहसीलदार संतोष रूईकर व कमल संतोष रूईकर यांनी श्री योगेश्वरी देवीची विधीवत महापुजा केली. या महापुजेसाठी सचिव अॅड. शरद लोमटे, विश्वस्त राजकिशोर मोदी, भगवानराव शिंदे,माजी आ. पृथ्वीराज साठे, कमलाकर चौसाळकर, गिरधारीलाल भराडिया, प्रा. अशोक लोमटे, उल्हास पांडे, श्रीराम देशपांडे, संजय भोसले, डॉ. संध्या जाधव, गौरी जोशी, पूजा राम कुलकर्णी यांच्यासह पुरोहित, मानकरी व भाविक उपस्थित होते. यावेळी पुरोहितांच्या मंत्रोपच्चारात व विधीवत महापूजेनंतर महाआरती झाली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ महिन्यांपासून सर्व मंदिरे बंद आहेत. नवरात्राच्या पार्श्वभूमीवर मंदिरे सुरू होतील. अशी अपेक्षा भाविक बाळगून होते. मात्र, नवरात्रातही मंदिरे बंद राहिल्याने भाविकांचा मोठा हिरमोड झाला. दरवर्षी योगेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरा होतो. मंदिरात विविध कार्यक्रमांची मोठी रेलचेल असते. पहाटे चार ते रात्री बारापर्यंत दर्शनरांगा सुरू राहायच्या मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दर्शन बंद ठेवल्याने नवरात्र महोत्सवात सर्व विधीवत उपक्रम बंद दरवाजाआड सुरू आहेत. आज झालेल्या नवरात्र महोत्सवास शासनाच्या सर्व सूचनांचे पालन करत महोत्सव सुरू आहे.