वीटभट्ट्यांमुळे पर्यावरण धोक्यात
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरात व परिसरात मुख्य रस्त्यालगत अनेक वीटभट्ट्या थाटण्यात आल्या आहेत. यातील अनेक वीटभट्ट्यांना रीतसर परवानगी नसतानाही अशा भट्ट्या सुरू आहेत. पर्यावरणाला मोठा धोका निर्माण करणाऱ्या या वीटभट्ट्या शहरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण करत आहेत. प्रदूषण निर्माण करणाऱ्या या वीटभट्ट्यांवर महसूल प्रशासनाने ठोस कारवाई करावी, अशी मागणी शहरवासीयांमधून होत आहे.
कार्यालयाच्या भिंती रंगलेल्याच
अंबाजोगाई : शासकीय कार्यालयाच्या भिंतीवर ‘येथे थुंकू नये’ अशा सूचना लिहिलेल्या असतात. परंतु त्याच शासकीय कार्यालयातील कर्मचारी व कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांकडून त्याचे सातत्याने उल्लंघन होते. परिणामी शासकीय कार्यालयाच्या भिंती रंगलेल्याच दिसतात. यावर कडक कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.