अंबाजोगाई : महाराष्ट्रााचे शक्तीपीठ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवास शनिवारपासून प्रारंभ होत आहे. १७ आॅक्टोबर ते २५ आॅक्टोबर या कालावधीत श्री योगेश्वरी देवीच्या मंदिराच्या गाभाऱ्यात यावर्षीचा नवरात्र महोत्सव साजरा होणार आहे. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी दर्शन बंद ठेवण्यात आले आहे. नवरात्र मंदिरातील पुजारी, पुरोहित व विश्वस्त यांच्याच उपस्थितीत साजरा होणार आहे. या महोत्सवासाठी प्रशासनाच्या वतीने अनेक मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्याने मंदिर प्रशासनाला अनेक बाबींची दक्षता घ्यावी लागणार आहे.
अंबाजोगाईचे ग्रामदैवत व महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी नवराक्ष महोत्सवात हजारो भक्त येतात. मात्र, या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भक्ताविना महोत्सव साजरा करण्याची वेळ आली आहे. यावर्षी मंदिरे बंद ठेवण्यात आल्याने भाविकांचा मोठा हिरमोड झाला आहे. तर प्रशासनाने अनेक मार्गदर्शक तत्वे नवरात्र महोत्सव साजरा करतांना सांगितल्याने मंदिर प्रशासनाला मोठी दक्षता घ्यावी लागणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव महोत्सवात उद्भवू नये म्हणून होणारा महोत्सव मंदिरातील पुजारी, पुरोहित व विश्वस्त यांच्याच उपस्थितीत होणार आहे. पारंपारिक पद्धतीने दरवर्षीचा साजरा होतो. त्याच धर्तीवर विधीवत सर्व उपक्रम मंदिराच्या गाभाऱ्यात होणार आहेत. मास्क, सॅनिटायझर्सचा वापर व सुरक्षित अंतर ठेवून हे सर्व उपक्रम होतील. शनिवारी सकाळी देवल कमिटीचे अध्यक्ष तथा तहसीलदार संतोष रूईकर यांच्या उपस्थितीत घटस्थापना होणार आहे. दरवर्षी घटस्थापनेनंतर भाविकांच्या लागणाऱ्या मोठ्या रांगा मात्र यावर्षी असणार नाहीत.
मंदिर परिसरात मंदिर बंद असतानाही जर भाविकांनी गर्दी केली तर ती गर्दी दूर करण्यासाठी पोलिस बंदोबस्त मंदिर परिसरात ठेवण्यात आला आहे. भाविकांना मंदिर परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून श्री योगेश्वरी देवीचे दर्शन घेता येणार आहे. मात्र, यासाठी गर्दी होऊ नये याचीही दक्षता घेण्यात येत असल्याचे देवल कमिटीचे अध्यक्ष तथा तहसीलदार संतोष रूईकर, सचिव अॅड. शरद लोमटे यांनी सांगितले.