संडे स्टोरी
तीन महिने घाम गाळून अपार कष्ट केले. पेरणी, खुरपणी, फवारणी करून पडत्या पावसातही कसेबसे पीक जोपासले. पीक बहरलेले असतानाच परतीचा मुसळधार पाऊस कोसळला अन् शेतकऱ्यांच्या पिवळ्या सोन्याची काळी कहाणी शेतकऱ्यांच्या नशिबी आली. सोन्यासारख्या पिवळ्या सोयाबीनचं अक्षरश: मातेरं झालं. या दुर्दशेमुळे उत्पादन खर्च तर सोडाच साधा वाहतुकीचाही खर्च निघणे कठीण झाले आहे.
...
अंबाजोगाई तालुक्यात शेतकऱ्यांच्या पाठीशी लागलेले ग्रहण काही सुटता सुटेना. नवनवीन संकटे शेतकऱ्यांसमोर उभीच आहेत. गेल्या पाच वर्षांपासून अत्यल्प असणाऱ्या पावसामुळे दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून निसर्गाने चांगला पाऊस दिला. तरीही शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागला. यावर्षी पेरणीपासूनच शेतकऱ्यांच्या पाठीशी ग्रहण लागले. पेरणीसाठी घेतलेले बियाणे अनेक ठिकाणी बोगस निघाले. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट अनेक शेतकऱ्यांवर कोसळले. एकवेळ पेरणी करणे दुरापास्त अशी स्थिती असताना दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर कोसळले. याहीस्थितीत शेतकऱ्यांनी धीर सोडला नाही. उसनवारी व कर्जबाजारी होऊन दुबार पेरणी केली. त्यानंतर सोयाबीन जोमात आले. मात्र, पुन्हा वादळ व अतिवृष्टीसारख्या पावसाने थैमान मांडले. शेतांचे तलाव झाले. त्यामुळे सोयाबीनचे पीक पाण्यात बुडाले. यावेळी लागलेल्या शेंगा पावसात भिजल्याने त्यांना कोंब फुटू लागले तर अनेकजणांचे सोयाबीन काळवंडले तर कुठे कुजले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सोयाबीनच्या शेंगा काळ्या निघाल्या आहेत. यामुळे काळवंडलेले सोयाबीन शेतकऱ्यांच्या पदरी पडले. अशाही स्थितीत सोयाबीन काढणीसाठी मजूर मिळत नाहीत. मजूर उपलब्ध झाले तर पडत्या पावसामुळे चिखलात सोयाबीन काढायचे कसे? हा प्रश्न निर्माण झाला. मजुरीचे दर दुप्पट वाढले. दुबार पेरणी, फवारणी, रासायनिक खते, काढणीचा दुप्पट खर्च यात शेतकरी मोठ्या प्रमाणात डुबला, तर निघालेले सोयाबीनही काळवंडले. अशास्थितीत शेतीचा गाडा हाकायचा तरी कसा? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.
शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात येण्यापूर्वी ११ ते १२ हजारांचा भाव होता. मात्र, या महिन्यात बाजारात सोयाबीन विक्रीसाठी येणार म्हणताच एका झटक्यात भाव चक्क निम्म्यावर आले. गेल्यावर्षीच्या भाववाढीचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच जास्त झाला. आता असणारा ५ हजार रुपयांचा भावही स्थिर राहील, अशी स्थिती नाही. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना बाजारात सोयाबीनची विक्री करायची म्हटले तर डागीला सोयाबीनला भावही मिळणार नाही. अशा स्थितीमुळे मिळेल त्या भावात सोयाबीनची विक्री करून पुढील रब्बी हंगामाची तयारी सुरू झाली आहे. या सोयाबीनमधून उत्पादन खर्च तर सोडाच वाहतुकीचा खर्चही निघणे दुरापास्त झाले आहे.
...
आकडे जुळविण्यात यंत्रणा व्यस्त
अंबाजोगाई तालुक्यात गेल्यावर्षी १०८० शेतकऱ्यांचे बियाणे बोगस निघाले. या शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. त्यांना ज्या कंपन्यांनी फसवले, त्या कंपन्यांवर शासनाने गुन्हे दाखल केले. आता त्या कंपन्यांनी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, असे आदेश शासनाने दिले. काही कंपन्या शेतकऱ्यांना पैसे देऊ लागल्या. मात्र, काही कंपन्यांची यंत्रणा अजूनही आकडे जुळविण्यातच व्यस्त आहे. त्यातच बाजारात बनावट कीटकनाशके विक्रीसाठी आल्याने त्याचाही फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
...
पाऊस थांबला; संघर्ष कायम
तब्बल आठवडाभर झालेल्या मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले. पाऊस थांबला तरीही शेतकऱ्यांचा विविध कारणांमुळे संघर्ष सुरूच आहे. या झालेल्या पावसाचा पिकांना फटका बसला असला, तरी शेतरस्त्यांच्या झालेल्या दुरवस्थेमुळे वाहतुकीची साधने ठप्प झाली आहेत. अनेकांच्या शेतातच सोयाबीनच्या सुड्या सडल्या आहेत, तर शेती आणि शेतरस्तेही जलमय झाले आहेत. अशास्थितीत शेतकऱ्यांचा पावलोपावली संघर्ष सुरूच आहे.
...
250921\img-20210924-wa0016.jpg
सोयाबीन च्या पिकात पाणी