लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान व अंबाजोगाईचे ग्रामदैवत श्री योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष नवरात्र महोत्सव १४ ते २२ डिसेंबर या कालावधीत साजरा होत आहे. महोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात आराध बसणाऱ्या महिलांच्या निवासाची व्यवस्था देवल कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच धार्मिक व सामाजिक उपक्रमाचे आयोजन केल्याची माहिती कमिटीचे अध्यक्ष तथा तहसीलदार संतोष रुईकर, सचिव भगवानराव शिंदे यांनी दिली.महोत्सवाच्या कालावधीत मंदिरात आराध बसण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून आहे. या परंपरेनुसार किमान १० ते १५ हजार महिला सलग नऊ दिवस मंदिरातच निवासासाठी असतात. या महिलांची व्यवस्था योगेश्वरी देवल कमिटीच्या वतीने केली जाते. निवासव्यवस्था, पिण्याचे पाणी व स्वच्छता या बाबी समोर ठेवून मंदिर प्रशासनाची उपाययोजना सुरू आहे. तसेच महोत्सवाच्या कालावधीत दररोज कीर्तन, प्रवचन, भजन व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १४ डिसेंबर शुक्रवारी सकाळी १० वाजता वर्णी महापूजेने महोत्सवास प्रारंभ होणार आहे. तसेच सलग आठ दिवस विविध उपक्रम मंदिरात राबविले जातात. २२ डिसेंबर रोजी महोत्सवाची सांगता होम-हवन व महापूजेने होऊन, रात्री आठ वाजता योगेश्वरी देवीची पालखी मिरवणूक शहरातून निघते. सर्व उपक्रमास भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन विश्वस्तांनी केले आहे.
आजपासून योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष महोत्सवास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 12:38 AM