- अनिल लगड
आष्टी - तालुक्यात मागील आठ दिवसांपासून ढगफुटी सदृश्य पावसाने थैमान घातले आहे. यात शेतीमालासह नागरिकांच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी रविवारी आष्टी तालुक्यातील ब्रम्हगांव येथे शेतकऱ्यांच्या बांधावर चिखल तुडवत जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी कुजलेले सोयाबीन पीक हातात घेऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. तुम्ही एकटे नाहीत शासन, प्रशासन तुमच्या पाठिशी म्हणत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला.
यावेळी आ.बाळासाहेब आजबे, उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे, तहसिलदार विनोद गुंडमवार, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते. आष्टी तालुक्यात परतीच्या पावसाने पूर परिस्थिती निर्माण झाली होती. धो धो पावसाने अनेक नद्या नाल्यांना पूर आला. अनेक ठिकाणी पूल तुटले. वाहतूक ठप्प होती. काही गावांचा संपर्क तुटला. शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जमिनी खरडून गेल्या. या उद्भवलेल्या स्थितीची जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी रविवारी पाहणी केली. कांदा, कापूस, सोयाबीन, तूर पिकांची पाहणी केली. यावेळी पूरग्रस्त नागरिकांना मदत देण्यासंदर्भात तात्काळ पंचनामे करून अहवाल पाठवावा अशा सूचना जिल्हाधिकारी शर्मा यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना यावेळी दिल्या.