बीड : संशयी स्वभाव, अपेक्षाभंग आणि जबाबदाऱ्यांचे ओझे यातून पती-पत्नीच्या नात्यात कटुता निर्माण होते. जिल्हा पोलीस दलाच्या भरोसा सेलकडे आठ महिन्यांत अशा ३४० तक्रारी आल्या. यापैकी ७४ प्रकरणांमध्ये भरोसा सेलने समेट घडवून आणला. ‘तुझं माझं जमेना म्हणणाऱ्यांची आता तुझ्यावाचून करमेना...’ अशी स्थिती आहे.
कौटुंबिक छळाच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी भरोसा सेलची स्थापना करण्यात आली आहे. पती-पत्नीतील वादाच्या तक्रारी भरोसा सेलकडे आल्यानंतर तक्रारअर्ज घेऊन संबंधितांना एकत्रित आणले जाते. दोघांच्याही बाजू समजून घेतल्या जातात. एकमेकांच्या मनातील जळमटे तसेच समज, गैरसमज दूर करुन त्यांच्या संसाराची विस्कटलेली घडी पुन्हा व्यवस्थित बसविण्याचे काम भरोसा सेलमार्फत केले जाते.
....
संशयामुळे पती-पत्नीत वादाची ठिणगी
अनेक प्रकरणांमध्ये केवळ संशयामुळे नवरा-बायकाेत वादाची ठिणगी पडते. पत्नी मोबाईलवर कोणाशी बोलते, पतीला घरी यायला उशीर कसा काय झाला, असा परस्परांबद्दल संशय घेण्यात येतो. मधूर नात्याला गैरसमजाची दृष्ट लागते, यातून वाढत गेलेली दरी घटस्फोटाच्या उंबरठ्यापर्यंत येऊन ठेपते.
....
क्षुल्लक कारणांवरुन पती-पत्नीतील वाद विकोपाला जातात. पती-पत्नीच्या वादात दोन्हीकडील नातेवाईकांचा अधिक हस्तक्षेप असतो. त्यामुळे हा वाद मिटण्याऐवजी वाढत जातो. भरोसा सेलकडे तक्रार आल्यावर दोघांनाही समोरासमोर बोलावून समुपदेशन केले जाते. समेट घडविण्याचाच प्रयत्न असतो. मात्र, एकमेकांना समजून घेण्याची तयारी नसेल तर प्रकरण पोलीस ठाणे किंवा काेर्टात वर्ग केले जाते.
- मनीषा लटपटे, उपनिरीक्षक तथा भरोसा सेल प्रमुख, बीड
...
३४०
आठ महिन्यांत भरोसा सेलकडे आलेली प्रकरणे
७४
प्रकरणांत घडूवन आणला समेट
....
अंबाजोगाई, आष्टीत हवे भरोसा सेल
जिल्ह्यात भरोसा सेलचे कामकाज पोलीस अधीक्षक कार्यालयातून चालते. आष्टी व अंबाजोगाई येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयांच्या अखत्यारित पोलीस ठाणे हद्दीतील तक्रारदारांना बीडला येणे गैरसोयीचे होते. त्यामुळे या दोन उपविभागांसाठी स्वतंत्र भरोसा सेल सुरु करणे गरजेचे आहे.
.....