बीड : ‘बधाई हो! मैं स्नॅपडील कपंनी से बात कर रहां हू, आपको १२ लाख रूपयों की लॉटरी लगी है, गाडी चाहिये या पैसा’ असे म्हणणारा कॉल बीडमधील एका महिलेला आला. परंतु सदरील महिलेने वेळेची सजगता दाखवित सायबर क्राईम विभागाशी संपर्क साधला आणि हा सर्व प्रकार खोटा असल्याचे समोर आले. वेळीच सतर्क झाल्यामुळे सदरील महिला या टोळीच्या फसवणुकीपासून वाचली. हा प्रकार बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास बीड शहरात घडला.
सोनल अरविंद पाटील (रा.बँक कॉलनी, बीड) असे त्या महिलेचे नाव आहे. सोनल या गृहिणी आहेत. मंगळवारी दुपारी त्यांना ८२२६८७९२९६ या क्रमांकावरून कॉल आला. समोरचा व्यक्ती हिंदीमधून बोलत होता. त्याने त्यांचे नाव, गाव विचारून घेतले. आपल्याला १२ लाख रूपयांची लॉटरी लागल्याचे त्याने सांगितले. यावेळी सोनल यांना धक्काच बसला. त्यांनी हा प्रकार आपले पती अरविंद पाटील यांच्या कानावर घातला. त्यानंतर पुन्हा त्यांचा कॉल आला. अरविंद पाटील यांना तुम्हाला पैसे हवे आहेत की गाडी, असे विचारले. त्यांनी थोडा वेळात सांगतो, असे सांगून फोन बंद केला. त्यानंतर पाटील दाम्पत्याने तात्काळ हा प्रकार सायबर पोलीस ठाण्यात कळविला. येथील सहायक फौजदार शेख सलीम, आसेफ सय्यद आणि विकी सुरवसे यांनी याबाबत खात्री केली. त्यानंतर सलीम शेख यांनी त्या व्यक्तीसोबत बातचित केली.
हा सर्व प्रकार खोटा असल्याचे त्यांच्या लक्षात आला. त्यांनी आम्ही तुम्हाला भेटायला येतोत, असे म्हणताच समोरच्या व्यक्तीने फोन बंद केला. सायबर क्राईमने केलेल्या जनजागृतीमुळेच पाटील यांनी त्यांच्याशी संपर्क केला. याचा फायदाही त्यांना झाला आणि होणाऱ्या फसवणुकीपासून ते बचावले. अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे, अनिलकुमार जाधव यांनी सायबर टिमचे स्वागत केले.
खाते क्रमांक, पत्ता मागितलाफसवणुकीच्या उद्देशाने संपर्क केलेल्या व्यक्तीने तुमच्या बँक खात्यावर पैसे पाठवितो, त्यासाठी आपला खाते क्रमांक आणि पत्ता द्या, असे सांगितले. त्यानंतर पुढची प्रक्रिया सांगतो, असेही त्यानेच सुचविले. पाटील यांनी चपळाई दाखवित पासबुक पाहून सांगतो, असे म्हणत १० मिनिटांनी संपर्क साधण्यास सांगितले. या १० मिनिटांच्या कालावधीत त्यांनी सायबरशी संपर्क केला आणि या प्रकरणाचा पर्दाफाश झाला.
आंध्र प्रदेशमधून होता कॉलसायबर पोलीस ठाण्याचे स.फौ.सलीम शेख यांनी आपण कोठून बोलता असे विचारताच आपण आंध्र प्रदेश राज्यातून बोलत असल्याचे सांगितले. सलीम शखे यांनी सांगितले की, जास्तीत जास्त कॉल हे आंध्र प्रदेश, हरियाना, बिहार, दिल्ली, उत्तर प्रदेश व इतर राज्यातून येतात. या राज्यांमध्ये गावेची गावे अशी फसवणूक करण्यात तरबेज असल्याचे सांगितले.
सतर्क रहा; फसवणूक टाळासोनल पाटील यांनी वेळीच सतर्कता दाखवित सायबरशी संपर्क केल्यामुळे त्यांची फसवणूक झाली नाही. त्यामुळे यापुढे कोणाला असे फेक कॉल आल्यास आपली गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये, शिवाय असा कॉल आल्या तात्काळ सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क करा, असे आवाहन बीड जिल्हा पोलीस दलाने केले आहे.