बीड: तीन वर्षांपूर्वी विवाह झालेल्या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शहरातील नाळवंडी नाका परिसरातील गजानन नगरात घडली. तिचा पती शिक्षक असून, माहेरच्या मंडळींनी सासरच्यांविरुद्ध रोष व्यक्त करत मारहाण केल्याने एकच गोंधळ उडाला. यावेळी पोलीस व सुरक्षारक्षक गायब होते.
सीमा नीलेश राठोड (२२) असे त्या विवाहितेचे नाव आहे. सीमा यांचा तीन वर्षांपूर्वी नीलेश राठोडशी विवाह झाला होता. सीमा घरकाम करतात, तर नीलेश खासगी संस्थेत शिक्षक आहे. १६ जून रोजी सीमा घरी एकट्याच होत्या. घरी आडूला ओढणीने गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. जिल्हा रुग्णालयात डाॅक्टरांनी तपासणी करून मयत घोषित केले. यावेळी माहेरच्या मंडळींनी सासरच्यांवर आक्षेप घेत पतीसह सासू व सासऱ्यास जिल्हा रुग्णालयातच गचुरे पकडून मारहाण केली. आमची मुलगी तुम्ही मारली, असा आरोप करत गुन्हा नोंदवून अटकेची मागणी केली. दरम्यान, या सगळ्या गोंधळामुळे बाह्यरुग्ण कक्षातील कामकाज विस्कळीत झाले. सुरक्षारक्षकही गायब होते. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता.
सहायक निरीक्षक गोरक्ष पालवे, पो.ना. सुभाष मोटे, अजित शिकेतोड यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेेतली. नातेवाइकांची समजूत घातली. त्यानंतर १७ जून रोजी उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांकडे सोपविला. आत्महत्येमागील कारण अस्पष्ट असून, उशिरापर्यंत पेठ बीड ठाण्यात नोंद झाली नव्हती.
चौकी वाऱ्यावर, सुरक्षारक्षकही गायबदरम्यान, जिल्हा रुग्णालयात रात्री साडेआठ वाजता हा प्रकार घडला. यावेळी चौकीत एकही अंमलदार उपस्थित नव्हता. तर जिल्हा रुग्णालयातील सुरक्षारक्षक देखील गायब होते. नातेवाइकांत वाद झाल्याने डॉक्टर, परिचारिकांना इतर रुग्णांवर उपचार करण्यात देखील अडथळा आला होता.
ही घटना कळाल्याबरोबर जिल्हा रुग्णालयात भेट दिली. माहेरची मंडळी संतप्त होती. त्यांची समजूत घालून उत्तरीय तपासणी केली. अद्याप तक्रार प्राप्त नाही. तक्रार आल्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.- केदार पालवे, सहायक निरीक्षक, पेठ बीड ठाणे.