बीड : जुणे नाणे लाखो रुपयांना विकले जाते, असे आमिष दाखवून काही वेबसाईट आर्थिक फसवणूक करीत आहेत. असाच एक प्रकार गेवराई तालुक्यातील बंगालीपिंपळा येथील एका तरुणासोबत घडला आहे. त्याला ६३ हजार ६०० रुपयांना ऑनलाइन गंडा घालण्यात आला आहे.
जुने नाणे लाखो रुपयांना खरेदी केले जाते, अशा विविध वेबसाईट्च्या जाहिराती ऑनलाइन दिसतात. अशा स्वरूपाची ‘ओल्ड कॉईन सेलर’ ही वेबसाईट सूरज तुकाराम तळतकर (रा. बंगालीपिंपळा ता. गेवराई) याने पाहिली व ती ओपन करून त्याच्याकडे असलेल्या जुन्या नाण्यांच्या संदर्भातील माहिती त्या वेबसाईटवरील मोबाइल क्रमांकावर फोन करून एका व्यक्तीस दिली. जुन्या नाण्याला चांगली किंमत पाहिजे असल्यास विविध स्वरूपाचे शुल्क लागते, असे सांगून व जास्तीच्या रकमेचे आमिष दाखवून सूरज तळतकर याच्याकडून ६३ हजार ६०० रुपये घेतले. त्यानंतर त्या व्यक्तीने त्याचा फोन बंद केला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे सूरज याच्या लक्षात आल्यानंतर त्याने चकलंबा पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर या प्रकरणी मोबाइल क्रमांकाच्या आधारावर अभिषेक अचित्यकुमार मोडाल (रा. गुरुपल्ली शांतिनिकेतन, बोलपूर, पश्चिम बंगाल) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.