बीड : रुग्णालयाच्या इमारतीवरून उडी मारलेल्या तरुणाला अपघात विभागात दाखल केले. तत्काळ सर्जनला कॉल दिला; परंतु ते आलेच नाहीत. अखेर ८ तासांनंतर जखमी तरुणाचा तडफडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकाराने अधिकाऱ्यांचे ढिसाळ नियोजन आणि डॉक्टरांचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
अबोध भोसले (वय ३१, रा. सावरगाव, ता. भूम, जि. उस्मानाबाद) असे मृताचे नाव आहे. अबोधचे शिक्षण डी.एड्. झालेले आहे. तो सध्याा पुण्याजवळील एका गावात राहत होता. काही दिवसांपूर्वीच त्याने तणावामुळे गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यात सुदैवाने तो बचावला आणि त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू होते. परंतु परिस्थिती गरीब असल्याने त्याला बीडच्या जिल्हा रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी दाखल केले. त्याच्यावर स्थलांतरीत रुग्णालयातील वाॅर्ड क्रमांक ६ मध्ये उपचार सुरू होते. रविवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास अबोधने वरच्या मजल्यावरून खाली उडी मारली. त्यात त्याला पाठीला थोडी जखम झाली होती, परंतु आतमध्ये जास्त जखम असल्याचे सांगण्यात आले. त्याला तत्काळ अपघात विभागात दाखल केले. येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. शंकर काशीद यांनी त्याच्यावर तत्काळ उपचार सुरू केले. त्यानंतर सर्जन, मानसोपचारतज्ज्ञ यांना कॉल देण्यात आला. मानसोपचारतज्ज्ञांनी येऊन तपासणी करत औषधी दिले. परंतु अबोधला शरीरात आतून जखम असल्याने सर्जनची गरज होती. सकाळी ९ वाजेच्या सुमारास अबोधने शेवटचा श्वास घेतला. अबोध तडफडून मेला परंतु सर्जन रुग्णालयात फिरकलेच नसल्याचे सांगण्यात आले. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच अबोधचा जीव गेल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. याबाबत पोलीस चौकीत अबोधचा भाऊ आमोल यांनी जबाब दिला आहे.
फिजिशियनही फिरकेनात
जिल्हा रुग्णालयात कोविड वॉर्डमध्ये चार तर स्थलांतरीत जिल्हा रुग्णालयात ३ असे सात फिजिशियन आहेत. असे असतानाही स्थलांतरित रुग्णालयात कॉलवर या फिजिशियनला न ठेवता इतर डॉक्टरांच्या ड्युट्या लावल्या जातात. हे फिजिशियन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मर्जीतील असल्याने इकडे कधीच फिरकत नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. एसीएस डॉ. राठोड यांनी इतर डॉक्टरांना ड्युटी लावल्याचेही मान्य केले.
सीएस, एसीएस विरोधात सामान्यांमध्ये रोष
मागील काही दिवसांपासून जिल्हा रुग्णालयातील कारभार ढेपाळला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते, एसीएस डॉ. सुखदेव राठोड हे केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. कसलेही नियोजन नसल्याने सामान्य रुग्णांचे हाल होत आहेत शिवाय अबोधसारख्यांचा रोज जीव जात आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांविरोधात सामान्यांमध्ये तीव्र रोष आहे.
कोट
हा तरुण दोन दिवसांपूर्वी दाखल झाला होता. त्याला मानसोपचार तज्ज्ञ, फिजिशियनने उपचार केले होते. रविवारी रात्री हा तरण इमारतीवरून पडला. तो गंभीर जखमी होता. अपघात विभागात डीएमओने तपासले होते. सकाळी ९ वाजता मृत्यू झाला. नातेवाईकांच्या आरोपांचे काय ते बघू.
डॉ. सुखदेव राठोड, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, बीड
===Photopath===
150321\152_bed_4_15032021_14.jpeg~150321\152_bed_3_15032021_14.jpeg
===Caption===
पोलीस चौकीत जबाब देण्यासाठी आलेला अबोधचा भाऊ आमोल भोसले.~मयत अबोध भोसले