वैजापूर - मुस्लिम धर्मियांमध्ये मोबाईलवरुन तलाक देण्यास कोर्टाचा मज्जाव असतांना खंडाळा (ता.वैजापूर) येथील एका तरुणाने आपल्या पत्नीला तिच्या माहेरी चाळीसगाव येथे व्हाट्स अॅप वरुन तीन वेळा तलाक असा मँसेज पाठवून तलाक दिल्याची घटना उघडकिस आली आहे. याप्रकरणी जावेद साबेर पठाण याच्या विरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात मुस्लिम विवाह संरक्षण वटहुकुम २०१८ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जिल्ह्यातील अशा स्वरुपाचा हा पहिला गुन्हा असण्याची शक्यता आहे.
याप्रकरणी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, चाळीसगाव येथील निसार शेख यांची मुलगी शबाना हिचा डिसेंबर २०१६ मध्ये मुस्लिम रितिरिवाजाप्रमाणे खंडाळा येथील जावेद साबेर पठाण याच्याशी लग्न झाले होते. लग्नानंतर एक वर्ष शबानाला चांगले वागवण्यात आले. पण एक वषार्नंतर जावेद हा शबानाला मुलगी झाल्याच्या कारणावरुन त्रास देत होता. "तुज्या आईला पाच मुलीच झाल्या आहेत.तुला पण यानंतर मुलीच होतील. तुज्या बहितींना पहिला मुलगा झाला आहे, मग तुलाच मुलगी कशी झाली? असे विचारत तु मला नको आहेस. मी तुला तलाक देणार असुन दुसरी बायको करणार आहे असे जावेद पत्नीला वारंवार म्हणत असे. जावेद याने ९ सप्टेंबर रोजी तूला औरंगाबादला दवाखान्यात घेऊन जायचे आहे असे म्हणून गाडीत बसवले. पण औरंगाबादला न नेता त्याने तिला कन्नडला तिच्या मावशीकडे नेले. गाडी दुरुस्त करायची आहे असे सांगत ते शबानाला मावशीकडे सोडुन गेले. काही वेळाने गाडीचे काम कन्नडमध्ये होत नाही असे सांगुन चाळीसगावला वडीलांकडे नेले. तेथुन जावेद गाडीचालकासह गाडी दुरुस्तीसाठी गेले पण परत घरी आले नाहीत. त्यानंतर कन्नड येथील मावसभावाकडुन जावेद खंडाळा येथे गेल्याची माहिती मिळताच शबाना, निसार शेख व त्यांची पत्नी असे तिघे रात्री खंडाळा येथे आले. पण मला तु नको आहेस असे म्हणून जावेदने तिघांना घराबाहेर काढले. त्यानंतर जावेदने २३ सप्टेंबर रोजी शबाना उर्फ सबा हिला तिच्या मोबाईलवर व्हाट्स अपवर तीन वेळा तलाक असा मँसेज पाठवून बेकायदा तलाक दिल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. त्यावरुन जावेद पठाणविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.