परळी - विनापरवाना बेकायदेशीररित्या गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस बाळगणाऱ्या परभणीच्या एकास युवकास येथील संभाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. शहरातील बसस्थानकासमोर शुक्रवारी ( दि. ४) सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. राहुल सुदाम चाळक ( 30, रा. दर्गा रोड, परभणी ) अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास बसस्थानकासमोर राहुल चाळक कमरेला गावठी पिस्टल लावून उभा असल्याची खबर संभाजीनगर पोलीस ठाण्याचे डीबीपथकातील पोलीस नाईक विष्णु सानप यांना मिळाली. यावरून विष्णु सानप घटनास्थळी पोहोचले. त्यांनी राहुलची झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस आढळून आले. हे पिस्टल फुले नगरातील हिरासिंग प्रेमसिंग जुन्नि याच्याकडून विकत घेतले असल्याची माहिती राहुलने दिली.
याप्रकरणी राहुल चाळक व हिरासिंग प्रेमसिंग जुन्नि या दोघांविरुद्ध संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील राहुल चाळक यास अटक करण्यात आली असून दुसरा आरोपी हिरासींग जुन्नि हा फरार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस जमादार आर. एम. राठोड हे करीत आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, पोलीस उपनिरीक्षक मरळ, पोलिस जमादार व्यंकट भताने, विष्णू सानप यांनी केली.