अंबेजोगाई : येथील कृषी महाविद्यालय, अंबेजोगाई अंतर्गत विद्यार्थी समुपदेशन व रोजगार कक्ष तथा जिमखान्याच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते.
अध्यक्षस्थानी वनामकृविचेचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण तर उद्घाटक म्हणून आ नमिता मुंदडा या होत्या. यावेळी व्यासपीठावर माजी कुलसचिव डाॅ. दिगंबरराव चव्हाण, उषा ढवण, माजी सरपंच वसंतराव मोरे, वैजनाथ देशमुख, सुदाम पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांची उपस्थिती होती.
यावेळी उद्घाटक म्हणून बोलताना आ. नमिता मुंदडा म्हणाल्या की, जागतिक पर्यावरणाची योग्य काळजी घेण्याचे सामर्थ्य हे कृषीच्या विद्यार्थ्यांत आहे. कृषी अभ्यासक्रमाचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. आपल्या ज्ञानाचा वापर करून तसेच सामाजिक जाणिवेतून कृषी युवकांनी सामाजिक उत्तरदायित्व जोपासावे, असेही त्या म्हणाल्या. कृषी महाविद्यालयास सर्वोतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही दिली.
विद्यार्थ्यांनी आपल्या सर्वांगीण विकासासाठी व्यासंगी आणि अभ्यासू असले पाहिजे. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून ते साध्य करण्यासाठी त्या दिशेने योग्य ती पावले टाकली पाहिजेत. विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृतीचे जतन करावे, कृषीच्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी आकांक्षाची क्षितिजे पादाक्रांत करण्यासाठी अविरत ग्रंथ वाचन करावे, असे प्रतिपादन वनामकृविचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. प्रारंभी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासाचा आढावा सादर केला. तसेच स्वच्छ, सुंदर व हरित परिसर संकल्पनेसाठी सज्ज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. या कार्यक्रमात संभाजी हनुमंत गवळी, सूरज श्रीराम पोकळे, गणेश मधुकर कराड, पवन रामराव ठोंबरे, अनिल देवीदास पवार, भागवत बबन जायभाये, प्रियंका शिवाजी नखाते, भक्ती विजय पवार, सोनाली शिवाजी जाधव या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांकडून गौरव करण्यात आला. यासोबतच सामाजिक कार्यकर्ते विनोद पोखरकर यांनी कोरोना काळात समाजातील गरजूंना मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासल्याबद्दल मान्यवरांकडून त्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश रेवले यांनी तसेच गुणगौरव सोहळ्याचे संचालन सहायक प्रा.डाॅ. नरेशकुमार जायेवार यांनी तर उपस्थितांचे आभार सहयोगी प्राध्यापक डाॅ. दीपक लोखंडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डाॅ. अरुण कदम, डाॅ. प्रताप नाळवंडीकर, डाॅ. बसवलिंगआप्पा कलालबंडी, प्रा. सुनील गलांडे, डॉ. सुहास जाधव, डॉ. नरेंद्र कांबळे, डॉ. नरेशकुमार जायेवार, डाॅ. विद्या तायडे, डाॅ. योगेश वाघमारे, अनंत मुंढे, सुनील गिरी यांनी परिश्रम घेतले.