बीड : येथील तहसील कार्यालयात ईड्ब्ल्यूएस प्रमाणपत्रासाठी १७ ऑगस्ट रोजी तरुणांनी ठिय्या दिला. प्रमाणपत्रासाठी अडवणूक सुरू असून, दलालांचा सुळसुळाट वाढल्याचा आरोप बेरोजगार तरुणांनी केला.
विविध विभागांच्या पदभरतीसाठी मराठा समाजातील उमेदवारांना ईडब्ल्यूएसमधून १० टक्के जागा राखीव आहेत. त्यासाठी ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र हवे असते. बेरोजगार तरुण तहसील कार्यालयात हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी रोज गर्दी करतात. मात्र, उडवाउडवीची उत्तरे देऊन तहसील प्रशासनाकडून चालढकल केली जाते. या पार्श्वभूमीवर मंगळवारी
संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष राहुल वायकर, युक्रांदचे प्रा. पंडित तुपे यांच्या नेतृत्वात बेरोजगार तरुणांनी तहसील कार्यालयात अचानक ठिय्या दिला. यावेळी नायब तहसीलदार सुरेंद्र डोके यांनी तरुणांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काहींना प्रमाणपत्र मिळाले, तर काहीजण प्रतीक्षेत आहेत. एकट्या बीड तहसीलमध्ये ईड्ब्ल्यूएसची २००पेक्षा अधिक प्रकरणे प्रलंबित आहेत.
---
दलालांचा वाढता हस्तक्षेप
ईडब्ल्यूएस प्रमाणपत्रांची मागणी वाढताच तहसील कार्यालयात दलालांचा वावर वाढला आहे. रीतसर अर्ज करुन प्रमाणपत्रांची मागणी करणाऱ्यांना चार-चार दिवस हेलपाटे मारावे लागतात. मात्र, दलालांमार्फत गेल्यास दुसऱ्याच दिवशी प्रमाणपत्र हातात पडते. त्यामुळे बेरोजगारांना भुर्दंड सोसावा लागत आहे.
....
170821\244517bed_23_17082021_14.jpg
आंदोलन