बीड : मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, या मागणीसाठी केज तालुक्यातील साळेगाव येथील ३५ वर्षीय तरूणाने जलसमाधी घेतली. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.
संजय ज्ञानोबा ताकतोडे (३५ रा.साळेगाव ता.केज जि.बीड) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. सोमवारी रात्री तो घरातून निघून गेला होता.मंगळवारी सकाळी बीड तालुक्यातील पाली येथील बिंदुसरा धरणाच्या भिंतीवर त्याची बॅग आणि मोबाईल सापडला. पोलिसांना ही माहिती मिळाल्यावर त्यांनी धाव घेतली. दुपारी दीड वाजेच्या सुमारास मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. सध्या मृतदेह जिल्हा रूग्णालयात आणला असून नातेवाईकांनी गर्दी केली आहे. येथील वातावरण शांत असून पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे. ग्रामीण ठाण्याचे सपोनि शितलकुमार बल्लाळ, पोउपनि प्रदीप डोलारे, पोह कैलास ठोंबरे, लक्ष्मण जायभाये, आर.एच.भंडाणे, अमोल येळे, सफौ दिनकर एकाळ, शेख खय्यूम आदी कर्मचारी येथे बंदोबस्तावर आहेत.
दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी संजयने स्वत:च्या मोबाईलमध्ये व्हिडीओ तयार केला आहे. यामध्ये त्याने आरक्षणासह विविध मागण्या सरकारकडे केल्या आहेत. जवळपाव अडीच मिनीटांचा हा व्हिडीओ असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.