गंगामसला ( बीड ): उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी असे पूर्वी जेष्ठ मंडळीकडून ऐकायला मिळत असे. तसेच खेड्याकडे चला हे महात्मा गांधीचे म्हणणे होते. परंतु सध्या खते, बियाणे, मजुरी यासारख्या भांडवली खर्चाचे दर गगनाला भिडलेले असताना शेतीमालाचे दर पूर्णपणे गडगडले आहेत. यामुळे अडचणीत येणाऱ्या बेभरवशाच्या शेती व्यवसायावर तरूणपिढीचा भरवसा राहिला नाही. अशी स्थितीत ग्रामीण भागात होत असून तरुणांचा मिळेल ते काम करण्याकडे कल वाढला आहे.
एकीकडे रासायनिक खते, बियाणे, औषधे यांच्या दरात होणारी वाढ, शेतीतील नुकसानीमुळे मजुरांना मिळणारी अपुरी मजुरी, तसेच या स्थलांतराने कमी मनुष्यबळामुळे शेतीत मजुरांचा तुटवडा, मधूनच ओढवणारी आस्मानी संकटे, तर दुसरीकडे शेतीच्या मालाची सतत होणारी घसरण यामुळे शेतकऱ्यांचे व विशेष म्हणजे युवा पिढीचे मनोधैर्य खचत असताना पाहवयास मिळत आहे. म्हणूनच सध्याची युवा पिढी आपली शेती सोडून गावाबाहेर पुणे, नाशिक, मुंबई या ठिकाणी जाऊन मिळेल ते काम अगदी कमी मोबदल्यात करत आहेत. गेल्या काही दिवसात शेतकऱ्याचा माल कवडीमोल भावाने विकला जात आहे. दिवसरात्र उन्हात काबाडकष्ट करून आणलेले पीक बाजारात कवडीमोल भावाने विकले जात आहे.
भांडवली खर्च सोडाच साधा तोडणीचा खर्च निघणेही कठीण झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना आपली उभी पिके सोडून दिल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे. एकूणच सगळ्या बाजूंनी शेतीची पडझड झाल्याने अनिश्चित शेती व्यवसायाकडे युवा पिढी कानाडोळा करून नोकरीला प्राधान्य देत आहे.सरकारची चुकीची धोरणे, शेतीचा वाढता खर्च, निसर्गाचा लहरीपणा व बाजारभावातील तफावत यामुळे शेतीतून निश्चित उत्पादन निघण्याची आशा धूसर होत आहे. याचा परिणाम म्हणून परिसरातील युवा पिढी शेतीकडे कानाडोळा करून नोकरीकडे वळत आहे. असे शेतकरी कामगार पक्षाचे भाई अॅड. नारायण गोले पाटील यांनी सांगितले.
सेंद्रिय शेती करावी वेळेचे योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व सेंद्रिय शेती केल्यास चांगले पीक घेता येईल. - आर. जे. शेख, कृषी सहाय्यक