बीड : बहिणीसोबत प्रेमप्रकरणानंतर लग्न केले म्हणून संतापलेल्या भावाने मित्राच्या सहाय्याने मेहुण्याचा काटा काढला. हा थरार बीड शहरातील तेलगाव नाक्यावर बुधवारी सांयकाळी पाच वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसांत नोंद झालेली नव्हती. जिल्हा रूग्णालय परिसरात नातेवाईकांनी हंबरडा फोडला. यावेळी पोलसांचा तगडा बंदोबस्त होता.
सुमित वाघमारे (२५ रा.तालखेड ता.माजलगाव ह.मु. नागोबा गल्ली, बीड) असे मयताचे नाव आहे. सुमित हा आदित्य इंजिनिअरींग महाविद्यालयात अंतीम वर्षात शिक्षण घेत होता. याच वर्गात भाग्यश्रीही होती. या दोघांची मैत्री झाली. मैत्रीतून प्रेम आणि नंतर दीड महिन्यापूर्वी त्यांचा विवाह झाला होता. हा विवाह भाग्यश्रीच्या भावाला खटकत होता. त्याच्या मनात सुमितबद्दल राग होता. याबाबत त्यांच्यात अनेकदा वादही झाले.
बुधवारी भाग्यश्री व सुमित दोघे परीक्षा देण्यासाठी महाविद्यालयात आले. परीक्षा देऊन सायंकाळी दुचाकीवरून घरी परतत असतानाच महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर पांढऱ्या रंगाच्या कारमधुन (एमएच २३ - ३२५३) भाग्यश्रीचा भाऊ व त्याचा मित्र आले. दोघांनी कारमधुन उतरत सुमिवर धारधार शस्त्राने सपासप वार केले आणि कारमध्ये बसून सुसाट निघून गेले. भाग्यश्री मात्र मोठमोठ्याने ओरडत मदतीची मागणी करीत होती. एका रिक्षाचालकाने तात्काळ धाव घेत सुमितला रिक्षात घालून जिल्हा रूग्णालयात आणले. मात्र जास्त रक्तस्त्राव झालेला असल्याने त्याचा वाटेतच मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी तपासून त्यास मयत घोषित केले.
दरम्यान, ही माहिती वाऱ्यासारखी नातेवाईक व मित्रांना समजली. त्यांनी जिल्हा रूग्णालयात गर्दी केली. भाग्यश्री, सुमितची आई व मावशीने रूग्णालयात आल्यावर हंबरडा फोडला. यामुळे वातावरण सुन्न झाले होते. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाची नोंद पेठबीड ठाण्यात झालेली नव्हती.