बीड : कमी वेळेत तिप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या नाशिकच्या आरती चव्हाण व भाऊसाहेब चव्हाण (रा. श्रीरामनगर, ता. जि. नाशिक) या दाम्पत्यास बीड पोलिसांनी अटक केली. दोन वर्षांपूर्वी साडेअकरा लाख रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी चव्हाण दाम्पत्यासह दोन एजंटांवर बीड शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यातील एजंट फरार आहेत.नाईट बिलियन्स् चेंबर्स (केबीसी) या संस्थेच्या माध्यमातून चव्हाण दाम्पत्याने राज्यभर जाळे निर्माण केले. सर्वसामान्यांना दामदुप्पट देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करुन घेतली. हा सर्व पैसा शेअर बाजार व खाजगी कंपन्यांमध्ये गुंतवला. सुरुवातीला काही दिवस गुंतवणूकदारांना वेळेत पैसे परत केले. त्यानंतर मात्र हा सर्व प्रकार फसवणुकीचा असल्याचे परतूर तालुक्यातील आष्टी येथील गुन्हा दाखल झाल्यानंतर समोर आले. असाच काहीसा प्रकार बीडमध्येही घडला. मुदत संपूनही ठेव परत न मिळाल्याने बीडमधील अभिजित कल्याण गायकवाड यांनी शहर ठाण्यात २८ मे २०१६ रोजी केबीसीचे चव्हाण दांपत्य, एजंट संगीता मुळे, रामेश्वर पठारे (रा. औरंगाबाद) यांच्याविरोधात फिर्याद दिली. त्याप्रमाणे या चौघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.जालना, बीडमध्ये गुन्हे दाखल झाल्यानंतर राज्यभर केबीसीविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मालिका सुरु झाली. चव्हाण दाम्पत्याची नाशिकच्या कारागृहातून सुटका होताच बीडच्या प्रकरणात अटक झाली. पो. नि. सय्यद सुलेमान, उप नि. मनीषा जोगदंड यांच्या पथकाने ही कारवाई केली. त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. उर्वरित दोन फरार एजंटांचा शोध सुरु असल्याचे सुलेमान म्हणाले.
केबीसी घोटाळ्यातील आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 6:10 AM