गेवराई तालुक्यातील चार गावांत मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी भेट देऊन पाहणी केली. नियम मोडून दुकाने चालू ठेवणाऱ्या दुकानदारांना एकूण २७ हजार ५०० रुपयांचा दंड आकारला, तसेच ही दुकाने सील केली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या पथकाने परळी तालुक्यातील सिरसाळा प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन पाहणी केली. तेथील सोयी-सुविधांबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या. सिरसाळा परिसरात नियम मोडून दुकान चालू ठेवल्याप्रकरणी दोन दुकानदारांना दहा हजार रुपये दंड आकारण्यात आला. या पथकाने वडवणी तालुक्यातील पिंपरखेड आणि चिंचाळा येथेही भेट देऊन विनामास्क फिरणारे नागरिक व दुकानदारांकडून दहा हजार रुपये दंड वसूल केला.
प्रकल्प संचालक दादासाहेब वानखेडे यांच्या पथकाने पाटोदा तालुक्यातील पारगाव, भायाळा, तसेच पाटोदा पंचायत समिती येथे भेट दिली. लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याबाबत सरपंच, ग्रामसेवकांना सूचना केल्या. उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, दत्तात्रय गिरी यांच्या पथकाने पाटोदा तालुक्यातील पिठ्ठी नायगाव, पाटोदा आदी गावांना भेटी देऊन पाहणी केली. या परिसरातील कोविड केअर सेंटरची पाहणी करून आवश्यक सूचना केल्या, तसेच पिंपळवंडी आणि अंमळनेर येथे विनाकारण घराबाहेर फिरणारे नागरिक व नियम मोडणारे दुकानदार यांच्याकडून दहा हजार रुपयांचा दंड वसूल केला.