बीड : जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादीकडे बहुमत नव्हते. मात्र, जनतेचा कौल राष्ट्रवादीच्या बाजूने होता. माजी मंत्री सुरेश धस यांनी विश्वासघात करून भाजपला मदत केली. या सत्तांतरात मोठा व्यवहार झाला आहे. तो कसा व कुठे झाला याची इत्यंभूत माहिती आपल्याकडे आहे. भाऊ, पत्नी व मुलालाही धोका देणारे धस कधीच कोणाशी एकनिष्ठ राहू शकत नाहीत, असा पलटवार माजी मंत्री प्रकाश सोळंके, आ. अमरसिंह पंडित यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत शुक्रवारी केला.माजी मंत्री सुरेश धस यांनी कार्यकर्ता मेळाव्यात सोळंके व पंडित यांच्यावर बप्पी लाहिरी व सरकटे बंधू अशी खोचक टीका केली होती. त्याला या दोघांनी राष्ट्रवादी भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत जोरदार प्रत्युत्तर दिले.सोळंके यांनी धस यांच्यावर थेट टीका केली. ते म्हणाले, सुरेश धस यांना खलनायक म्हणावे की आगलावे हा प्रश्न आहे. धस यांच्या पत्नी संगीता धस यांचा पराभव व्हावा ही कोणाची इच्छा होती हे सर्वांनाच माहीत आहे. त्यांच्या धाकट्या पत्नीनेच संगीता धस यांच्या पराभवासाठी रसद पुरविल्याचा दावाही सोळंके यांनी केला.धस यांनी राजकीय स्वार्थासाठी स्वत:चा भाऊ, पत्नी व मुलाचा विश्वासघात केल्याची कोपरखळी त्यांनी मारली. धस यांनी नेहमीच पक्ष बदलले आहेत. गैरव्यवहार लपविण्यासाठीच त्यांनी भाजपला मदत केल्याचा आरोपही त्यांनी केला.आ. पंडित यांनीही धसांवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, पालकमंत्र्यांसमोर स्वत:चे महत्त्व वाढावे यासाठी धस हे धनंजय मुंडे यांच्यावर टीका करीत आहेत. सय्यद अब्दुल्ला यांना जिल्हापरिषदेचे अध्यक्ष करताना आम्ही त्यांच्या सोबत होतो. तेव्हा आम्ही कानफुके नव्हतो का ? असे ते म्हणाले.आम्हाला राजकीय वारसा आहे. आम्ही राजकीय कुटुंबात जन्मलो यात आमचा काय दोष ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. (प्रतिनिधी)
जि.प. सत्तांतरात धसांकडून मोठा व्यवहार
By admin | Published: April 15, 2017 12:07 AM