Ayodhya Ram Mandir News: जानेवारी २०२४ मध्ये अयोध्येतील राम मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा झाली. यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच भाविकांचा मोठा ओघ रामललाचे दर्शन घेण्यासाठी सुरू झाला. भाविकांचा जनसागर अयोध्येत लोटत आहे. दररोज सुमारे लाखो भाविक रामललाचे दर्शन घेत आहेत. यातच एका समोर आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या सहा महिन्यात सुमारे ११ कोटी भाविकांनी अयोध्येतील राम मंदिरात जाऊन रामललाचे दर्शन घेतले आहे.
उत्तर प्रदेश केवळ देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यात यशस्वी झालेले नाही, तर नवा विक्रम रचण्यासही सज्ज झाला आहे. सन २०२४ च्या जानेवारी ते जून अशा पहिल्या सहा महिन्यांत सुमारे ३३ कोटी पर्यटकांनी उत्तर प्रदेशला भेट दिली. अयोध्येतील श्रीराम मंदिरात रामलला विराजमान झाल्यानंतर तेथे येणाऱ्या भाविकांच्या संख्येने तसेच पर्यटकांनी काशीला मागे टाकले आहे.
रामलला विराजमान झाल्यानंतर भक्त, पर्यटकांची संख्या झपाट्याने वाढली
उत्तर प्रदेशचे पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री जयवीर सिंह म्हणाले की, अयोध्येतील श्रीराम मंदिरात रामलला प्रतिष्ठित झाल्यानंतर भाविकांचे आणि पर्यटकांचे आगमन झपाट्याने वाढले. जानेवारी ते जून या सहा महिन्यांत आतापर्यंत एकूण १० कोटी ९९ लाख देशी-विदेशी पर्यटक अयोध्येत आले. विक्रमी संख्येने भाविकांनी भगवान श्रीरामांचे दर्शन घेतले. एक प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणून अयोध्येने आपली नवीन ओळख निर्माण केली आहे. दररोज लाखो राम भक्त राम मंदिरात पोहोचत आहेत. तर वाराणसीमध्ये या सहा महिन्यांत एकूण देशी-विदेशी पर्यटकांची संख्या ४.६१ कोटी होती. सहा महिन्यांत ३३ कोटी पर्यटकांनी यूपीमधील विविध पर्यटनस्थळांना भेटी दिल्या.
दरम्यान, अयोध्येत भाविक तसेच पर्यटकांची ही वाढ राम मंदिरामुळे झाल्याचे पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. याचे संपूर्ण श्रेय श्रीराम मंदिराला जाते. या काळात देशी-विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने रामनगरीत आले व त्यांनी रामललाचे दर्शन घेतले. यूपीच्या इतर पर्यटन स्थळांबद्दल बोलायचे तर प्रयागराज येथे ४.६१ कोटी भाविक, पर्यटक आणि मथुरेत ३.०७ कोटी भाविक, पर्यटक पोहोचले.
आग्र्याबाबत बोलायचे तर, पहिल्या सहा महिन्यांत येथे ७६.८८ लाख देशी-विदेशी पर्यटक आले. राजधानी लखनऊमध्ये पर्यटकांची संख्या ३५ लाख इतकी नोंदवली गेली आहे. यापूर्वी २०२२ मध्ये एकूण ३१.८६ कोटी पर्यटकांची नोंद झाली होती. त्या तुलनेत यंदा पहिल्या सहा महिन्यांत जवळपास तेवढ्याच पर्यटकांनी भेट दिली.