Ganesh Chaturthi 2023: चातुर्मासातील श्रावण सरत आला की, सर्वांना वेध लागतात, ते लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाचे. चातुर्मासातील सर्वांत महत्त्वाचे आणि मुख्य आकर्षण म्हणजे गणेश चतुर्थी किंवा गणेशोत्सव. भाद्रपद महिना म्हटला की, केवळ आणि केवळ आठवतो तो गणेशोत्सव. महाराष्ट्रात गणेशोत्सवाला अनन्य साधारण महत्त्व आहे. बुद्धीची देवता, विघ्नहर्ता, सुखकर्ता, १४ विद्या आणि ६४ कला अधिपती असलेल्या गणेशाचे पूजन या महिन्यात केले जाते. अधिक श्रावण महिना आल्यामुळे यंदाचा गणेशोत्सव सप्टेंबर महिन्यात येत आहे. श्रावणातील सण-उत्सव साजरे करण्यासोबत गणपतीची तयारी सुरू केली जाते. मात्र, यंदा गणपती नेमके कधी? १८ की १९ सप्टेंबर रोजी? असा संभ्रम निर्माण होत असल्याची चर्चा आहे. याविषयी नेमके शास्त्र काय सांगते? ते जाणून घेऊया...
मराठी वर्षात लाडक्या गणपती बाप्पाचे तीन जन्म मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. विविध स्वरुपात गणपतीचे पूजन केले जाते. महादेव शिवशंकर, भगवान विष्णू यांच्याप्रमाणे गणपतीनेही विविध अवतार धारण केल्याच्या कथा पुराणांमध्ये आढळतात. गणपतीच्या वेगवेगळ्या अवतारांपैकी तीन जन्मदिवस अत्यंत महत्त्वाचे मानले आहेत. एक वैशाख पौर्णिमेला पुष्टिपती विनायक जन्म, भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजचे गणेश चतुर्थी आणि माघ महिन्यातील चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती. पैकी भाद्रपद चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थीपासून पुढे १० दिवस गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. (Ganesh Chaturthi 2023 Date And Time)
यंदा गणपती नेमके कधी? १८ की १९ सप्टेंबर रोजी?
आपल्या देशात अनेक पंचांगे काढली जातात. त्या त्या प्रदेशात ती ती पंचांगे वापरून त्यानुसार व्रत-वैकल्ये, सण-उत्सव साजरे केले जातात. यंदाच्या गणेशोत्सवाची सुरुवात देशभरातील अनेक पंचांगात १८ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीने होणार असल्याचे दाखवण्यात आले आहे. तर महाराष्ट्रात काही पंचांगात गणेश चतुर्थीची तारीख १९ सप्टेंबर दाखवण्यात आली आहे. काही पंचांगाप्रमाणे १८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजून ५३ मिनिटांनी गणेश चतुर्थी लागत असल्याचे दाखवण्यात आले आहे. तर काही पंचांगात १८ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजून ३८ मिनिटांनी गणेश चतुर्थीचा प्रारंभ दाखवण्यात आला आहे.
शास्त्रानुसार गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्याची योग्य वेळ कोणती?
गणपती कधी बसवावेत, याबाबत शास्त्रात काही माहिती देण्यात आली आहे. “चतुर्थी गणनाथस्य मातृविद्धा प्रशस्यते। मध्याह्नव्यापिनी चेत्स्यात् परश्चेत् परेऽहनीति॥”, असे शास्त्र सांगते. सूर्योदयापासून गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येत असली तरी मध्यान्ह काळी गणपतीची विशेष पूजा करावी, असे सांगितले गेले आहे. दुपारी ११ वाजून १५ मिनिटांपासून ते ०१ वाजून ४१ मिनिटांपर्यंत मध्यान्ह काळ असल्याचे शास्त्र सांगते. त्यामुळे या मध्यान्ह काळात चतुर्थी मिळणे आवश्यक असून, त्यानुसार गणपती पूजन करावे, असे सांगितले जात आहे.
सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा
वास्तविक पाहता आपल्याकडे सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आहे. पंचांगातही सूर्योदयाच्या तिथीप्रमाणे गोष्टी दिलेल्या असतात. प्रदोषकाळी करावयाची व्रते आणि संकष्ट चतुर्थी याला सूर्योदयाची तिथी धरली जात नाही. कारण, सदर व्रते संबंधित तिथी लागली की केली जातात. संकष्ट चतुर्थीला चंद्रोदयाचे महत्त्व अधिक असल्यामुळे चतुर्थी तिथी लागली की, चंद्रोदयाची वेळ पाहून संकष्टी चतुर्थी धरली जाते. यंदाच्या गणेश चतुर्थीबाबत बोलायचे झाल्यास, मंगळवार, १९ सप्टेंबर रोजी सूर्योदयावेळी चतुर्थी तिथी आहे. चतुर्थी तिथी दुपारी ०१ वाजून ४४ मिनिटांनी समाप्त होत आहे. मध्यान्ह काळी गणपतीची विशेष पूजा करावी, असे जे शास्त्रात सांगितले गेले आहे. ही बाब १९ सप्टेंबर रोजी लागू होते. यंदाच्या गणपतीचे विशेष म्हणजे गणपती मंगळवारी येत असल्यामुळे अंगारक योग जुळून येत आहे. हा अत्यंत शुभ योग मानला गेला आहे. त्यामुळे आपापले कुळाचार, कुळधर्म आणि परंपरानुसार गणेश चतुर्थीला गणेश पूजन तसेच गणपतीची प्राणप्रतिष्ठा करावी, असे सांगितले जात आहे.