ज्योत्स्ना गाडगीळ
संकट आपला पिच्छा सोडत नसेल, तर आपण म्हणतो, काय साडेसाती मागे लागलीय! होणारे काम होता होत नसेल, तरीही आपण म्हणतो, बहुदा माझी साडेसाती सुरू आहे. आगामी काळात संकटाची चाहूल लागली, तेव्हाही आपले वाक्य हेच, माझी साडेसाती सुरू होणार असे दिसतेय. याचाच अर्थ साडेसाती या शब्दाभोवती काळानुकाळ नकारात्मक पुटं चढत गेली आहेत. २०२१ मध्ये तीन राशींना साडेसातीला सामोरे देखील जावे लागणार आहे. त्या राशी कोणत्या, हे जाणून घेण्याआधी साडेसाती खरोखरच वाईट असते की चांगली, ते समजून घेऊया.
साडेसातीचे महत्त्व:आयुष्यात सगळ्या गोष्टी चांगल्याच होत राहिल्या, तर आपल्याला त्याचे मोल कळणार नाही आणि अचानक संकट ओढावले, तर त्याला सामोरे जाण्याचे धैर्यही राहणार नाही. यासाठीच सुख-दु:खाचा फेरा सुरू असतो. साडेसाती हासुद्धा आयुष्याचे चढ-उतार दाखवणारा काळ. त्याला परीक्षा काळ असेही म्हणतात. कारण, तेव्हा आपल्या संयमाचा कस लागतो. ग्रहदशा पालटते. एवढेच काय, तर लोकांचेही आपल्याबद्दल ग्रह बदलतात परिणामी त्यांचे मुखवटे उतरल्यामुळे आपलेही त्यांच्याकडे बघण्याचे ग्रह बदलतात.
हेही वाचा : दुसऱ्यांसाठी अमंगल ठरणारा मंगळ, बाप्पाच्या नावात विराजमान झाला!
साडेसाती कधी येते? हा सगळा ग्रहांचा खेळ आहे. आपल्या राशीवर रवि, सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि या ग्रहांचा प्रभाव पडत असतो. सर्वसाधारण जन्मकुंडलीतील चंद्राच्या बाराव्या राशीत शनिने प्रवेश केला की, साडेसाती सुरू होते. ही पहिली अडीच वर्षे असतात. चंद्रराशीवरून शनिचे भ्रमण सुरू झाले की, दुसरी अडीच वर्षे व चंद्राच्या दुसऱ्या राशीत शनिने प्रवेश केला की, तिसरी अडीच वर्षे सुरू होतात. असा हा सर्व मिळून साडेसात वर्षांचा काळ म्हणून यास साडेसाती असे म्हणतात.
साडेसातीचा परिणाम :साडेसाती हा शनी-चंद्राशी निगडीत ग्रहयोग आहे. चंद्र हा मन व भाग्यकारक आहे. तर शनी हा ग्रहमंडळातील न्यायाधीश असून, न्यायसत्तेचे प्रतिक आहे. शनी हा शिस्तप्रिय ग्रह आहे. त्यामुळे शनी हा जीवनास कार्यरत करणारा महत्त्वाचा ग्रह आहे. मानवाच्या पूर्वकर्मानुसार त्यास शुभाशुभ फळ देण्याचा सर्वाधिकार शनिग्रहास आहे. त्यामुळे साडेसाती ही मानवाच्या आयुष्यातील शुद्धीकरण प्रक्रिया आहे, असे मानले जाते. या काळात सर्वांचाच रावाचा रंक होतो असे नाही, अनेकांना साडेसाती लाभदायीदेखील ठरते. हे प्रत्येकाच्या पूर्वकर्मावर अवलंबून असते. अशाच साडेसातीच्या काळात रंकाचे राव झाल्याचीही उदाहरणे बघायला मिळतात. त्यामुळे निराश होण्याचे किंवा घाबरण्याचे कारण नाही. या काळात धैर्याने परिस्थितीला तोंड देणे, हेच अभिप्रेत असते.
साडेसाती काळात काय उपाय करावेत?संकटकाळात आपण डगमगतो. खरे तर तेव्हाच आपली मुख्य परीक्षा असते. अशावेळी परिस्थिती आपल्या हातात नसली, तरी मनस्थिती स्वस्थ ठेवणे, हे आपल्या हातात असते. यासाठी उपासनेचा फायदा होतो. आपल्या इष्टदेवतेचा रोज जप करणे व जप करताना आकाश मुद्रा करणे लाभप्रद ठरते. स्वकष्टार्जीत धनातून गरजूंना अन्नधान्य दान करावे. हनुमंताचे दर्शन घ्यावे, समर्थ रामदासकृत मारुतीस्तोत्र म्हणावे, हनुमान चालीसा, बजरंगबाण किंवा सुंदरकांड ही हनुमंताच्या पराक्रमाचे गुणवर्णन करणारी स्तोत्रे म्हणावीत. हनुमंताची उपासना केल्याने मनोबल प्राप्त होते.
हे सर्व वाचून झाल्यावर साडेसातीबद्दल मनात भीती राहिली नसेलच. तरीदेखील, २०२१ मध्ये धनु, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांनी मनोबल वाढवले पाहिजे. कारण, यंदा त्यांच्या राशीला साडेसाती असणार आहे. सन २०२१ मध्ये शनी आपले स्वामित्व असलेल्या मकर राशीत विराजमान असणार आहे. २४ जानेवारी २०२० रोजी शनी गुरुचे स्वामित्व असलेल्या धनु राशीतून स्वगृही म्हणजेच मकर राशीत विराजमान झाला होता. एकाच राशीत शनी साधारणपणे अडीच वर्षे असतो. यानुसार, आगामी सन २०२१ मध्येही शनी मकर राशीत असेल. त्यामुळे धनु, मकर आणि कुंभ राशीच्या व्यक्तींना आगामी वर्षात साडेसाती असणार आहे. यापैकी धनु राशीच्या व्यक्तींचा साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. मकर राशीच्या व्यक्तींचा मधला टप्पा सुरू आहे, तर कुंभ राशीच्या व्यक्तींचा पहिला टप्पा सुरू आहे. या तीनही राशी मुळातच सोशिक वृत्तीच्या असल्यामुळे त्या साडेसातीवर निश्चितच मात करतील, यात शंका नाही. फक्त थोडी जोड हवी, ती उपासनेची आणि धर्मकार्याची!
हेही वाचा : नववर्षाचा आरंभ करूया दासबोधाने आणि प्रारंभ करुया गणेशाच्या स्मरणाने!