असे म्हणतात, की बोलणाीऱ्याची मातीही खपते, परंतु न बोलणाऱ्याचे हिरेही खपत नाहीत. परंतु खाबी लेम या आफ्रिकन तरुणाने न बोलता मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळवली आहे, ती केवळ टिक टॉकच्या माध्यमातून!
हो हो तेच टिकटॉक, जे भारत सरकारला बंद करावे लागले. कारण आपल्याकडे टिकटॉकचा गैरवापरच अधिक होऊ लागला. एवढेच नाही, तर आबालवृद्ध टिकटॉकच्या नादी लागून वेडेपिसे झाले. कोणी जीव गमावले तर कोणी अब्रू! याचे कारण हेच, की मोठे माध्यम हातात असूनही त्याचा सदुपयोग कसा करावा हे दुर्दैवाने भारतीय नेटिझन्सना कळले नाही. याचा अर्थ खाबी लेम हा तरुण त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून खूप काही ज्ञान देत आहे असेही नाही. तो तुमच्या आमच्या मनातल्या गोष्टी साध्या सोप्या आणि विनोदी पद्धतीने सादर करतो. त्या प्रेक्षकांना भावतात आणि त्याच्या नवीन व्हिडिओची उत्सुकता वाढते.
सद्यस्थितीत टिकटॉक या अॅपचे जेवढे फॉलोअर्स नाहीत, तेवढे फॉलोवर्स टिकटॉकवर प्रसिद्धी मिळवणाऱ्या या तरुणाचे आहेत. कोव्हीड काळात विनोदी कलाकार अशी ओळख त्याला मिळाली.
आपल्याकडे जशा पुरी भाजी चमच्याने आणि नूडल्स हाताने खाणाऱ्या वल्ली आहेत, तसेच परदेशात सुरीने केळ्याचे साल काढणारे, गाडीत कपडे अडकले म्हणून कात्रीने कापणारे लोक आहेत. अर्थात या विनोदनिर्मितीसाठी अतिशयोक्ती आहेच, परंतु परंतु ज्या गोष्टी सरळ मार्गाने होतात, त्यासाठी द्राविडीप्राणायाम कशाला, हे या मुलाच्या व्हिडिओचे मर्म असते. तो मख्ख चेहNयाने आणि साध्या पद्धतीने गोष्टी करून दाखवतो, ज्या गोष्टी सर्वसामान्यांच्या आयुष्यात रोजच घडतात. म्हणूनच कदाचित प्रेक्षकांना त्या जास्त भावतात. त्याचे अनुकरण करण्याचाही अनेकांनी प्रयत्न केला. परंतु लोकांनी तो प्रयत्न हाणून पाडला आणि या संकल्पनेच्या मूळ कलाकाराला प्रसिद्धी दिली. \
आफ्रिकेच्या एका छोट्याशा गावात खाबीचा जन्म झाला. बालपणही तिथेच गेले. पुढे नोकरीसाठी तो इटली येथे गेला. ही अभूतपूर्व प्रसिद्धी मिळण्याआधी तो साधा गिरणी कामगार होता. कोव्हीड काळात त्याने नोकरी गमावली होती. परंतु नवीन नोकरी शोधण्याऐवजी तो टिक-टॉक, इन्टाग्राम, फेसबुक अशा माध्यमांवर वेगवेगळे व्हिडिओ बनवण्याचे प्रयोग करत होता. तो तासनतास खर्च करून टिकटॉकवर व्हिडिओ बनवू लागला. या सातत्याने केलेल्या परिश्रमाचे फळ म्हणजे त्याचे मौनी बाबा बनून केलेले मजेशीर व्हिडिओ! त्याची दरदिवशी वाढणाऱ्या फॉलोअर्सची संख्या जगातल्या नामांकित लोकांपेक्षा जास्त आहे. या व्हिडिओतून तो दर दिवशी २००० अमेरिकन डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार जवळपास दीड लाख रुपये रोज कमवत आहे.
प्रयत्न, सातत्य आणि जिद्द या गोष्टी अंगी बाणल्या, तर एक सामान्य चेहरासुद्धा लोकांच्या मनात घर करू शकतो, हे खाबी लेम ने सिद्ध करून दाखवले. जर तो शून्यातून उभा राहू शकतो, तर आपण का नाही?