1 Lakh Tirumala Tirupati Laddu Offered Ram Lalla Ram Mandir Ayodhya: दक्षिण भारतातील तिरुमला तिरुपती बालाजी व्यंकटेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. दररोज लाखो भाविक या मंदिरात येऊन दर्शन घेतात. तर वर्षभरात भाविकांची संख्या अनेक कोटींपर्यंत पोहोचते. या मंदिरात दान देण्यात येणारी रक्कमही कोट्यवधी रुपयांच्या घरात जाते. तिरुमला तिरुपती मंदिरात देण्यात येणारा लाडू प्रसाद अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो.
तिरुमला तिरुपती बालाजी मंदिरात लाडू प्रसादाचे महत्त्व अनन्य साधारण मानले गेले आहे. महाप्रसादाचे हे लाडू बनवण्याच्या प्रक्रियेला 'दित्तम' असे म्हटले जाते. यात सर्व गोष्टी विशिष्ट प्रमाणातच घेतल्या जातात. गेल्या ३०० वर्षांत केवळ सहा वेळा हा लाडू करण्याची पद्धत बदलण्यात आली आहे. भारतीय समाजात लाडू शुभ आणि पवित्रतेचे प्रतीक आहे. तुपात भाजलेले छोटे तुकडे किंवा पिठी एकत्र करून लाडू बनवले जातात. एकता आणि संघटनेचे ते प्रतीक मानले जाते. तिरुपती लाडू खूप शुभ आणि पवित्र मानले जातात.
तिरुमला तिरुपती लाडू प्रसाद ठरलेलेच प्रमाण आणि तंतोतंत वजन
असे मानले जाते की, या प्रसादाचे सेवन केल्याने भगवान व्यंकटेश्वराचा आशीर्वाद प्राप्त होतो. तिरुमला तिरुपती लाडू हा व्यंकटेश्वर बालाजी देवाच्या आशीर्वादाचे प्रतीक आहे. तिरुपती लाडू हा केवळ स्वादिष्ट प्रसादच नाही तर त्यामागे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वही आहे. बालाजीकडून प्रसाद म्हणून ग्रहण केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी स्वीकारण्यामागील श्रद्धा आहे. काजूगर, साखर आणि वेलचीचे ठरलेले प्रमाणच हवे आणि वजन तंतोतंत हवे. लाडू बनविण्यासाठी बेसन, साखरेचा पाक, मनुके आदींचाही वापर होतो. ६०, १७५ आणि ७५० ग्रॅम अशा तीन प्रकारच्या वजनांमध्ये लाडू मिळतो. प्रोक्तम् प्रकारातील लाडू साधारणतः ६० ग्रॅमचे असतात. बहुतांश भाविकांना हेच लाडू दिले जातात. तसेच आस्थानम् प्रकारचे लाडू सणासुदीला तयार होतात, तर कल्याणमहोत्सवम् मध्ये मिळणारा लाडू हा कल्याणमहोत्सवम् मध्ये सहभागी होणाऱ्या भाविकांसाठीच तयार केला जातो.
६०० ब्राह्मणांची टीम अखंडपणे अविरतपणे दिवस-रात्र तयार करतात लाडू प्रसाद
तिरुमला तिरुपती देवस्थानम स्वयंपाकघराला स्थानिक भाषेत पोट्टू म्हणतात. प्रसादाचे लाडू फक्त तिरुमला तिरुपती देवस्थानच्या स्वयंपाकघरात बनवले जातात. यासाठी ६०० ब्राह्मणांची टीम रात्रंदिवस शिफ्टमध्ये काम करते. प्रसादाचे लाडू तयार करण्याचे काम अखंडपणे, अविरतपणे सुरू असते. लाडू बनवण्याचा प्रत्येक घटक घेताना अतिशय काळजी घेतली जाते. काश्मीरमधून केशर येते. सुका मेवा राजस्थान आणि केरळमधून घेतला जातो. वेलची केवळ केरळमधून येते. ३ ते ५ लाखांपेक्षा जास्त लाडू दररोज बनविण्यात येतात. ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल लाडू विक्रीतून देवस्थानला मिळतो. १५ दिवस हे लाडू टिकतात. ५० रुपयांत मध्यम आकाराचा एक लाडू मिळतो. २०० रुपयांत मोठ्या आकाराचा एक लाडू मिळतो. सन १७१५ पासून तिरुपती येथे प्रसाद म्हणून लाडू देण्यात येत आहे. सन २०१४ मध्ये लाडूला जीआय टॅग मिळाला होता.
रामलला चरणी १ लाख लाडू केले होते अर्पण
हे लाडू तयार करण्यासाठी १० टन बेसन, १० टन साखर, ७०० किलो काजूगर, १५० किलो वेलची, ३००-४०० लीटर तूप, ५०० किलो पाक, ५४० किलो मनुके याचे ठरलेले वजन आणि प्रमाण घेतले जोते. जानेवारी २०२४ मध्ये अयोध्येतील भव्य राम मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करण्यात होती. यावेळी तिरुमला तिरुपती बालाजी व्यंकटेश्वर मंदिर देवस्थानकडून सुमारे १ लाख लाडू अर्पण करण्यासाठी आले होते, असे अयोध्या रामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दासजी महाराज यांनी म्हटले आहे.