मनुष्य स्वभाव असा आहे, की तो कोणत्याही ऋतूत कुरकुरतच असतो. मग तो उन्हाळा असो, पावसाळा असो नाहीतर हिवाळा! तरीदेखील आवडता ऋतू कोणता, असे विचारल्यावर हिवाळ्याला बहुतांशी पसंती मिळते. कारण, या ऋतूमध्ये वर्षभरात साठलेल्या सुट्या, राहून गेलेल्या सहली आणि नवीन वर्षाच्या आगमनाचा उत्साह असे बरेच काही दाटून आले असते. म्हणून इतर दोन ऋतूंच्या तुलनेत हिवाळ्याचा उत्साह वेगळाच असतो. अनेकदा अलार्मपूर्वी जाग येते आणि धुक्याची पांघरलेली पहाट अनुभवण्याचा योग जुळून येतो. हे झुंजूमुंजू वातावरणच वैशिष्ट्य आहे धुंधुरमासाचे!
सूर्य एका वर्षात १२ राशींतून भ्रमण करत असतो, तो ज्या महिन्यात धनु राशीत असतो, त्या मासाला धनुर्मास किंवा धुंधुरमास म्हणतात. तर काही लोक झुंझुरमास असेही म्हणतात.या दिवसात भल्या पहाटे उठून मोसमी भाज्या, फळे खाल्ली जातात. मकरसंक्रातीच्या आदल्या दिवशी येणारी भोगी हा या महिन्याचा शेवटचा दिवस असतो. हा काळ १३-१७ डिसेंबरच्या आसपास सुरू होऊन १३-१५ जानेवारीला संपतो. हिंदू पंचागात हा काळ मार्गशीर्ष-पौष या काळात येतो.
हा कालखंड दक्षिणायनात हेमंत ऋतूमध्ये असतो. यावेळी हवेत अत्यंत गारठा असतो. विशेषत: रात्री गारठा जास्त जाणवतो. दिवस लहान व रात्र मोठी असते. शरीर थंड व जठराग्नि प्रज्वलित होतो. अर्थात भूक जास्त लागते. परंतु, त्याचवेळेस पचनक्रिया मंदावलेली असते, म्हणून पौष्टिक आहारावर भर दिला जातो.
बलिन: शीतसंरोधात् हेमन्ते, प्रबलोऽनल:भवति।
याचा परिणाम असा होतो, की मनुष्याला सकाळी लवकर भूक लागते. आयुर्वेदात हा परिणाम असा वर्णन केला आहे-
दैघ्र्यात् निशानाम् एतर्ही, प्रात: एव बुभुक्षित: (भवति)।
आरोग्याचा नियम असा की भूक लागल्याशिवाय खाऊ नये आणि भूक लागल्यावर खाण्यास विलंब करू नये.भूक लागल्यावरही जर अन्न पोटात गेले नाही तर त्याचा परिणाम असा होतो-अल्पेन्धनो धातून् स पचेत्
अग्नीला इंधन हवे असते.ते मिळाले नाही तर तो विझून जातो. जठराग्नीचे इंधन म्हणजे अन्न. अग्नी प्रदीप्त झाल्यावर ते त्याला मिळालेच पाहिजे. न मिळेल तर तो रस, रक्त इत्यादी धातूंचा नाश करतो. आणि थकवा जाणवू लागतो, वजन कमी होते.
हे सर्व टाळायचे अस, तर अग्नीला त्या त्या वेळी इंधन पुरवले पाहिजे.म्हणून धनुर्मासात प्रात: एव म्हणजे सूर्योदय झाल्याबरोबर आहार करणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले.
इंद्र, वरुण, अग्नी, सूर्य अशा अनेक देवतांमुळे आपल्याला अन्नपदार्थ उपलब्ध होत असतात, म्हणून आपण भोग घेण्यापूर्वी थोडा त्यांना अर्पण करावा. त्यांनीच दिलेले भोग त्यांना न देता जो स्वतः उपभोगतो तो स्तेन म्हणजे चोर ठरतो. धनुर्मासात सकाळी सकाळी कितीही कडकडून भूक लागली असली तरी ताजे गरम अन्न आधी सूर्याला अर्पण करावे, म्हणजे नैवेद्य दाखवावा आणि मग भक्षण करावे अशी परंपरा आहे.
धनुर्मास हे महिनाभर आचरण्याचे व्रत आहे. किमान गारठा असेपर्यंत आणि सकाळी भूक लागते आहे तोवर तरी निश्चितच आचरावे.आरोग्यशास्त्र आणि धर्मशास्त्र यांचा सुंदर मेळ धुंधुरमास व्रतात दिसतो.