जिवंतपणी व्यक्ती विषय वासनेत अडकलेली असते. ज्ञानाच्या परमार्थाच्या गोष्टी आत्मसात करत नाही आणि अचानक मृत्यू आला की सर्व काही जागच्या जागी सोडून परलोकी निघून जाते. अशा वेळी आत्म्याच्या उद्धारासाठी व त्याला योग्य दिशेने गती मिळावी यासाठी गरुड पुराणाने पिंडदान महत्त्वाचे आहे असे सांगितले आहे.
असे मानले जाते की मृत्यूच्या तेराव्या दिवशी, पिंडातून आत्मा ब्रह्माण्डात जातो. हा सूक्ष्म आत्मा परमात्म्यात विलीन होण्यासाठी त्याला योग्य दिशा दर्शवणे गरजेचे असते. या तेरा दिवसात व्यक्तीने आयुष्यभर केलेल्या पाप पुण्याचा हिशोब केला जाऊन त्याला त्याच्या कर्मानुसार गती मिळते. श्राद्ध विधी त्याकरिताच सांगितलेल्या आहेत. या विधीनुसार आत्म्याला सर्व विकारातून, विषयातून मुक्त करून अखिल विश्वशक्तीत सामावण्याचा मार्ग दर्शवला जातो.
मृत्यूपश्चात तेरा दिवस आत्मा घुटमळत असतोगरुड पुराणानुसार मृत व्यक्तीचा आत्मा १३ दिवस त्याच्या आवडत्या व्यक्तीजवळ, विषयांजवळ घुटमळत राहतो. या काळात त्याला राहिलेल्या इच्छा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पुन्हा देहात प्रवेश करायचा असतो. परंतु एका जन्मात अनंत यातना भोगल्यानंतर पुन्हा जन्मच नको, तर मोक्ष मिळावा, यासाठी आत्म्याला विषय वासनेपासून मुक्त केले जाते. जिवंत पणी केलेल्या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आत्म्याला मोहपाशापासून दूर करण्यासाठी श्राद्धविधी केला जातो.
पिंड दान देऊन आत्म्याला अन्न मिळतेदरम्यान, नातेवाईक १० दिवस आत्म्यासाठी पिंड दान करतात. ज्याद्वारे त्याचे सूक्ष्म शरीर तयार होते. पहिल्या दिवसापासून आत्मपिंड, दुसर्या दिवसापासून मान आणि खांदा, तिसऱ्या दिवसापासून हृदय, चौथ्या दिवसापासून पाठ, पाचव्या दिवसापासून नाभी, सहाव्या दिवसापासून आठव्या दिवसापर्यंत कंबर व खालचा भाग, भूक आणि तहान इ. जाणीव नवव्या आणि दहाव्या दिवसापर्यंत तयार होतात . असा सूक्ष्म देह धारी आत्मा परलोकीच्या प्रवासाला निघतो. या सर्व गोष्टींसाठी श्राद्ध विधी महत्त्वाचा मानला जातो.