>> सागर सुहास दाबके
देवपूजा हा आपल्या दिनचर्येचा एक भाग असतो. प्रत्येकाची देव पूजेची पद्धत वेगवेगळी असली, तरी पुण्यसंचय व्हावा आणि देवाचे नाव घेऊन दिवस छान जावा हा आपला उद्देश असतो. घरात ज्येष्ठ मंडळी असली तर ती साग्रसंगीत देवपूजा करतात. नोकरी व्यवसाय करणारी मंडळी असली तर आपल्या सवडीनुसार देवपूजा करतात. तर घरातले इतर सभासद दोन हस्तक आणि तिसरे मस्तक झुकवून मानसपूजा करून आपापल्या कामाला लागतात. मात्र, धर्मशास्त्र सांगते, देवपूजेआधी एक पूजा फार महत्त्वाची असते, ती कोणती? याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
सूर्याला अर्घ्यदान करणे, ही देवपूजेच्या आधीची प्राथमिक पायरी असते. सूर्याला अर्घ्य दिल्याशिवाय शिव अथवा विष्णु यांच्या पूजेची योग्यता प्राप्त होत नाही. ती पूजा निष्फळ ठरते. गीतेत वचन आहे,
तस्माच्छास्त्रं प्रमाणं ते कार्याकार्यव्यवस्थितौ । ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि ।। (१६-२४)
हे अर्जुना, काय करावे आणि काय करू नये , याचा निर्णय तू स्वतः घेऊ नकोस , त्यासाठी शास्त्राची व्यवस्था आहे. शास्त्र विधान काय आहे ते जाणून घेऊनच तू कर्म करण्यास योग्य होशील. त्यामुळे आपली मर्यादित बुद्धी आणि मर्यादित इंद्रिये यांचा आश्रय न घेता शास्त्र जे सांगते ते मान्य करावे आणि जास्तीत जास्त पालन करण्याचा प्रयत्न करावा. चिकित्सा करावी, पण ती पूर्ण होईपर्यंत शास्त्रपालन थांबवू नये. म्हणजे "आधी मला या विधानाचा कार्यकारणभाव समजला पाहिजे , मग मी ते पालन करीन" हा दुराग्रह सोडून द्यावा. म्हणून सूर्याला अर्घ्य दिल्याशिवाय देवपूजा करू नये.
ज्यांना गायत्री मंत्राचा विधिवत उपदेश झाला आहे त्यांनी संध्या करावी आणि अंगभूत अर्घ्यप्रदान करावे. पूजेसाठी पंधरा मिनिटे काढत असाल तर संध्येसाठी अजून पाच मिनिटे काढा. तसं पाहिलं तर विधिवत संध्या करायला किमान वीस मिनिटे लागतात शक्यतो तशीच करावी. पण वेळेअभावी तशी संध्या शक्य नसेल तर संक्षिप्त संध्या तरी करावी. सूर्याला तीन अर्घ्ये द्यावीत आणि गायत्री मंत्राचा दहा वेळा जप करावा. कर्म सफल होण्यासाठी तुम्हाला एवढाच वेळ अधिक द्यायचा आहे हे लक्षात घ्यावे. ज्याला गायत्री मंत्राचा उपदेश नाही त्याने केवळ नाममंत्राने सूर्याला अर्घ्ये द्यावीत. 'सूर्याय नमः अर्घ्यम् समर्पयामि ।"
यावन्नदीयते चार्घ्यं भास्कराय महात्मने ।तावन्नपूजयेद्विष्णुं शिवं वापि कदाचन ।। (२८-४०)
जोपर्यंत सूर्याला अर्घ्य दिले जात नाही तो पर्यंत कधीही शिव अथवा विष्णूचे पूजन करू नये. तुम्ही भगवंताच्या ज्या कोणत्या रूपाची पूजा करता ते एकतर शिवरूप असते किंवा विष्णुरूप! त्यामुळे शिवविष्णु यांसाठी सांगितलेला नियम सर्व देवांसाठी प्रयुक्त आहे.
अदीक्षितस्तु तस्यैव नाम्नैवार्घ्यं प्रयच्छति ।श्रद्धया भक्तिभावेन भक्तिग्राह्यो रविर्यथा ।। (२८-३४)
ज्याला मंत्रदीक्षा नाही त्याने श्रद्धा आणि भक्तिपूर्वक नाममंत्राने अर्घ्य द्यावे. सूर्यनारायण भक्तीने दिलेले अर्घ्य स्वीकारतात.
ये वार्घ्यं सम्प्रयच्छन्ति सूर्याय नियतेन्द्रियाः ।ब्राह्मणाः क्षत्रिया वैश्याः स्त्रियः शूद्राश्च संयताः ।। (२८-३७)भक्तिभावेन सततं विशुद्धेनान्तरात्मना ।ते भुक्त्वाभिमतान्कामान्प्राप्नुवन्ति परां गतिम् ।। (२८-३८)
जे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, स्त्रिया आणि शूद्र विशुद्ध अंतःकरणाने, भक्तिभावाने, इंद्रियांचा निग्रह करून सूर्याला अर्घ्य देतात ते यथोचित भोग घेऊन उत्तम गति प्राप्त करतात. तुम्ही स्त्री, पुरुष, कोणीही असा, सूर्याला अर्घ्य देणे हा तुमचा अधिकार देखील आहे आणि कर्तव्य देखील, असे ब्रह्मपुराणात म्हटले आहे.
एखाद्या मोठ्या पिंपाला खाली छिद्र असेल आणि त्यात तुम्ही दिवस भर जरी पाणी ओतत राहिलात तरी ते पिंप भरणार नाही, तुमचे कष्ट व्यर्थच होतील. पण ज्या क्षणी तुम्हाला हे सांगणारा मनुष्य भेटेल की पिंप खाली फुटलंय, त्याची आधी व्यवस्था कर, मग पाणी भर, तर त्याला दोष देण्याऐवजी पिंप अच्छिद्र करण्याचा प्रयत्न करावा. तद्वत आपली साधना, उपासना हीदेखील अच्छिद्र करण्याकडे आपला कल असावा.
आपल्याला रोजचे जीवन कसे जगावे , अगदी श्वास कसा घ्यावा हे देखील माहीत नाही. हे सगळे शास्त्रात आहे. अगदी मूत्रत्याग कसा करावा, गुदप्रक्षालन कसे करावे हे देखील लिहून ठेवलेले आहे. त्याचे अनुसरण केले तर निश्चित अनारोग्य दूर होईल. जिज्ञासा धरा, जाणून घ्या.