महाभारतातील धृतराष्ट्र यांचे अमात्य विदुर यांचे विचार विदुरनीती म्हणून ओळखले जातात. एका अध्यायात त्यांनी पुरुषार्थ जपावा कसा याचे मार्गदर्शन केले आहे. ते एका श्लोकात म्हणतात-
क्रोधो हर्षश्च दर्पश्च ह्रीः स्तम्भो मान्यमानिता।यमर्थान्नपकर्षन्ति स वै पण्डित उच्यते।।
सामान्य व्यक्ती ज्या कारणांमुळे असामान्य पदाला जाते, त्या तत्त्वाला पुरुषार्थ म्हणतात. तो जपण्यासाठी मनुष्याला आपल्या स्वभावावर आणि वागणुकीवर नियंत्रण मिळवावे लागते. त्या चार बाबी कोणत्या, तर विदुर सांगतात, रागाच्या भरात आणि आनंदाच्या भरात चुकीचे निर्णय घेतले जातात. ज्याला या चुका टाळायच्या असतील, त्याने मनावर नियंत्रण ठेवून सम दुःख सुखक्षमी अर्थात सुख आणि दुःखात एकसारखी तटस्थ स्थिती ठेवण्याची कला आत्मसात केली पाहिजे.
ह्रीः अर्थात नम्रता. विनम्र व्यक्तीचे काम कधीच अडत नाही. याउलट अहंकारीत व्यक्ती सगळे काही गमावून बसते. म्हणून स्वभावात नम्रपणा आणून आपले काम करवून घेण्याचे कसब अंगी बाणले पाहिजे. परंतु यासाठी लाचारी पत्करणे योग्य नाही. लाचार व्यक्ती कोणत्याही क्षणी लाथाडली जाऊ शकते. जे काम नम्रपणे होऊ शकते ते खुशमस्करी करून पदरात पाडून घेणे योग्य नाही.
स्वतःबद्दल आत्मविश्वास जरूर बाळगावा, परंतु दुराभिमान नको. स्वतःला श्रेष्ठ समजणे योग्य नाही. मी म्हणेन ती पूर्व असे म्हणत राहिलो तर आपोआप इतरांबद्दल कमीपणा वाटून स्वतः मधील अहंकाराला खतपाणी घातले जाईल. ते टाळले पाहिजे. यासाठी स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवा, स्वतःला कमी लेखू नका पण स्वतःला सर्वेसर्वा समजण्याची चूक करू नका.
विदुर नीती प्रमाणे या चार गोष्टी लक्षात आचरणात आणून मानाने जगू शकतो.