वयाच्या तीस वर्षाआधी असे करा, चाळीशी आधी तसे करा, वगैरे सांगणाऱ्या अनेक पोस्ट समाज माध्यमांवर आपण वाचत असतो. त्या यादीतल्या किती गोष्टी पूर्ण केल्या आणि किती राहून गेल्या याची बेरीज वजाबाकी करताना अपूर्ण राहिलेल्या गोष्टींबद्दल मनाला हुरहूर लागून राहते. तसे उर्वरित आयुष्यातही घडू नये, म्हणून प्राधान्य क्रम ठरवणे गरजेचे असते. प्रत्येक गोष्टीची एक क्रमवारी ठरलेली असते. त्यात फेरबदल झाले तर गडबड होण्याची शक्यता असते. म्हणून काही नियम हे पाळावेच लागतात.
हे केवळ व्यवहार ज्ञान नसून हे पारमार्थिक ज्ञानदेखील आहे. आपल्याला भगवंत हवा, तर आधी त्याचा ध्यास धरा. त्याला मिळवण्यासाठी त्याच्या आवडीचे काम करा, मग तो मिळेल अशी अपेक्षा ठेवा. परंतु काही न करता त्याची कृपादृष्टी प्राप्त होईल, अशी अपेक्षा ठेवणे म्हणजे अभ्यास न करता परीक्षेत उत्तीर्ण होण्यासारखे आहे. यासाठीच इथेही गरजेचा असतो, प्राधान्यक्रम!
म्हणून आयुष्यात सहा गोष्टी कायम लक्षात ठेवा आणि त्यांचा प्राधान्यक्रम ठरवून टाका...
- प्रार्थनेआधी विश्वास ठेवा.
- बोलण्याआधी ऐकून घ्या.
- खर्च करण्याआधी कमवा.
- लिहिण्याआधी विचार करा.
- पराभवाआधी प्रयत्न करा.
- आणि मरण्याआधी जगा.
या गोष्टी समजून उमजून आयुष्यात आणल्या, तर आयुष्याचे गणित कधीच चुकणार नाही!