ज्योत्स्ना गाडगीळ
'देवाक काळजी' असे आपण सहज बोलून जातो. परंतु आयुष्याच्या अनेक टप्प्यावर आपल्याला दिव्यत्त्वाची प्रचिती येते. फक्त आपण त्याकडे सजगतेने पाहत नाही. याबाबत साधू गौरांग दास एक दृष्टांत सांगतात.
एके ठिकाणी, विष्णुसहस्रनामाचे पारायण सुरू होते. अनेक लोक नित्यपारायणाला येत आणि भंडाऱ्याचा प्रसाद घेऊन जात असत. असेच एके दिवशी, पारायण झाले आणि भंडाऱ्याला सुरुवात झाली. सगळे भाविक शिस्तबद्धपणे एका रांगेत उभे होते. सेवक प्रसाद वाढण्यासाठी उभे राहिले. तेवढ्यात एक फाटक्या वेषातील व्यक्ती, हातात भले मोठे पात्र घेऊन पुढे आली आणि प्रसाद मिळवण्यासाठी धडपड करू लागली. सेवकांनी तिला रांगेने यायला सांगितले. परंतु, ती व्यक्ती अरेरावी करू लागली आणि चर्चेचे पर्यवसान वाद-विवादात झाले.
सेवक त्या व्यक्तीला श्रीपाद रामानुज स्वामी यांच्याकडे घेऊन आले. स्वामींनी त्या व्यक्तीला अभय दिले आणि त्याच्या गैरवर्तणुकीबद्दल विचारणा केली. स्वामींना शरण येऊन ती व्यक्ती म्हणाली, 'स्वामीजी, माझ्या घरात सहा लहान-लहान मुले आहेत. ती उपाशी आहेत. त्यांना या प्रसादाची जास्त गरज आहे.''अरे, पण प्रसाद तर सर्वांनाच मिळणार होता ना?'- स्वामीजी उत्तरले.'काय सांगावं? भली मोठी रांग संपेपर्यंत प्रसादही संपला असता तर? मी आणि माझी मुले उपाशी राहिलो असतो. म्हणून मी घुसखोरी केली. मला प्रसाद द्या स्वामी....'
हेही वाचाः विष्णुसहस्रनाम रोज ऐका, 'अधिक' मासाचे 'अधिक' फळ मिळवा!
स्वामींनी सेवकांना सांगून व्यक्तीसाठी प्रसाद बांधून दिला. प्रसाद सोपवताना स्वामीजी म्हणाले, 'तू इथे विष्णुसहस्रनाम म्हणायला येत होतास ना, थोडेसे मलाही म्हणून दाखवतोस?' तोंडघशी पडणार, या भीतीने त्या व्यक्तीने स्तोत्र म्हणायला सुरुवात केली.
ओम विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्यभवत्प्रभु:।भूतकृद् भूतभृद् .....
एवढे म्हणून ती थांबली. कारण पुढचे स्तोत्र पाठ नव्हते. त्या श्लोकाच्या शेवटच्या शब्दाचा आधार घेत स्वामीजी म्हणाले, 'तुला १००० नावांपैकी फक्त ६ च नावे पाठ आहेत? त्या सहाव्या नावावर लक्ष केंद्रित कर. भूतभृद् म्हणजे, अशी व्यक्ती, जी अखिल विश्वाचा सांभाळ करते, पोषण करते. तुला जर, हा अर्थ उमगला असता, तर तू अशी कृती केली नसती आणि परमेश्वरावर भार टाकला असता. म्हणून प्रत्येक नामाचे महत्त्व समजून घे आणि संपूर्ण विष्णुसहस्रनाम आत्मियतेने पाठ करून दररोज भगवंताचे स्मरण कर.
हेही वाचाः देवाकडे काय मागितलं, तर सगळे प्रश्न सुटतील?... सांगताहेत सद्गुरू वामनराव पै
ती व्यक्ती खजिल होऊन प्रसाद घेत निघून गेली. स्वामीजींच्या सांगण्याप्रमाणे भक्तीभावाने विष्णुसहस्रनामाचे पठण करू लागली. मठात सामुहिक पठण आणि प्रसादाचे वाटप सुरू होते. मात्र, काही दिवसात एक अजबच घटना घडू लागली.
भंडारा वाटून संपेपर्यंत भगवान कृष्णासमोर ठेवलेला नैवेद्य गायब होऊ लागला. सेवकांनी ही बाब स्वामीजींच्या कानावर घातली. स्वामींना अचानक त्या दीन व्यक्तीची आठवण झाली आणि विचारपूस केल्यावर, त्या व्यक्तीचे येणे बंद झाले, असे कळले. सेवकांना त्या व्यक्तीवर संशय आला. स्वामीजींनी त्या व्यक्तीची भेट घ्यायची, असे ठरवले.
ती व्यक्ती नदीच्या पलीकडे असलेल्या गावात राहत होती. स्वामीजी येताच ती नम्रपणे उभी राहीली आणि नतमस्तक झाली. स्वामीजींनी तिची ख्यालीखुशाली विचारली आणि मठात न येण्याचे कारण विचारले. आपण घरीच स्तोत्रपठण करतो, असे ती म्हणाली. कुटुंबाच्या पालपोषणाचे काय? असे विचारले असता, ती व्यक्ती म्हणाली,
'स्वामीजी, विष्णुसहस्रनामाचे पठण सुरू केल्यापासून एक तरुण रोज प्रसादपात्र घेऊन येतो आणि तो आपला सेवक आहे असे सांगतो. आपण एवढी कृपादृष्टी ठेवलीत, धन्य झालो.'
यावर स्वामीजी म्हणाले, 'मी कोणीही सेवक पाठवला नाही. स्वयं परमात्मा तुमची क्षुधाशांती करण्यासाठी सेवकरूपाने तुझ्या द्वारी आला. हे तुझ्या श्रद्धेचे आणि भक्तीचे फळ आहे. भगवंतावर अशीच श्रद्धा कायम ठेव. कारण, तोच या जगाचा पालनकर्ता आहे.'
हेही वाचाः अधिक मास म्हणजे काय?... या 'बोनस' महिन्यात काय करावं, काय टाळावं?... जाणून घ्या