ज्योत्स्ना गाडगीळ
'अधिकस्य अधिकम फलम्' असे म्हणत, अधिक मासात महिनाभर आपण विविध तऱ्हेने पूजा अर्चना करीत, देवाकडून स्वत:साठी बरेच काही मागून घेतले. पुण्यसंचय केला. आजपासून तीन दिवस, साऱ्या विश्वावर आलेले संकट दूर व्हावे म्हणून दान मागुया. असे दान,जे माऊलींनी विश्वात्मक देवाकडे मागितले, 'पसायदाना'च्या रूपाने!
आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,तोषोनि मज द्यावे, पसायदान हे।।
संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने ९००० ओव्यांचा वाक् यज्ञ केल्यावर, त्याची सांगता करत असताना ९ ओव्यांमध्ये भगवंताकडे मागणे मागितले. स्वत:साठी का? नाही...तर विश्वासाठी! हेच संतलक्षण आहे. आपल्या पूर्वजांनी, ऋषीमुनींनी, साधू-संतांनी जेव्हा जेव्हा भगवंताकडे याचना केली, त्यात कधी स्वार्थ नव्हताच, तर केवळ 'समष्टी'साठी प्रार्थना होती. आठवून पहा...
आरती झाल्यावर आपण एक भला मोठा श्लोक म्हणतो, त्याला 'मंत्रपुष्पांजली' म्हणतात. तो पाठ करून, घोकून, रेटून, आवाजाची चढाओढ करून म्हणताना जेवढी गंमत वाटते ना, तेवढीच त्याचा अर्थ जाणून घेतल्यावरही वाटेल. 'पृथ्वीव्यै समुद्रपर्यंता या एकराळिती' केवढा दूरचा विचार ऋषींनी करून ठेवला आहे. आपण केवळ पृथ्वीवरील जीवांचा विचार करतो, परंतु ऋषीमुनी ब्रम्हांडाचा, समस्त सृष्टीचा आणि प्रत्येक जीवाचा विचार करून त्यांचे भले होवो, असे मागणे मागतात, तेव्हा आपल्या थोर भारतीय संस्कृतीचा अभिमान वाटल्यावाचून राहत नाही.
हेही वाचा: तुम्ही तरुनि विश्व तारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा!; माऊलींची माऊलीने काढलेली समजूत.
तीच बाब, गाऱ्हाण्याची...गावच्या देवळातल्या मूर्तीसमोर गावगड्याने घातलेले मालवणी गाऱ्हाणे, 'बा देवा म्हाराजा, जगाच्या नाथा, रवळनाथा' म्हणत गावच्या प्रत्येक घरासाठी केलेली प्रार्थना आणि इतरांनी 'व्हय म्हाराजा' म्हणत दिलेली पुष्टी हीदेखील वैश्विकप्रार्थनाच नव्हे का...?
देवासमोर उभे राहिलो, की आपले हात फक्त आपल्या सुख शांतीसाठी जोडले जातात. परंतु, हा आपला धर्मसंस्कार नाही. 'सर्वेपि सुखिन: सन्तु:' अर्थात सगळे सुखी झाल्याशिवाय मी सुखी होऊच शकत नाही, हे समाजभान आपल्याला संतांनी करून दिले आहे.
पसायदानातही माऊली विश्वात्मक देवाला आर्जव करते, माझ्याकडून जो वाग्यज्ञ करवून घेतलास, त्यात सारे काही सांगून झाले आहे आणि आता मागायची वेळ आली आहे. हे मागणे माझ्या एकट्यासाठी नसून अखिल विश्वासाठी आहे, ते तू पूर्ण कर. तोषावे म्हणजे तृप्त हो आणि तृप्त होऊन मी जे सर्वांसाठी मागतोय, ते पसाय म्हणजे प्रसादरूपी दान आमच्या पदरात घाल.
जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे
माऊलींना माहित आहे, आजवरचा इतिहास पाहता सृष्टीत सत्व-रज-तम वृत्तीचे लोक वारंवार निपजत असतात. म्हणून पृथ्वीवरील वातावरण संतुलित आहे. यातील तम वृत्ती सर्वांचे अहित योजणारी असते. देवा-दानवांपासून, थोर राष्ट्रपुरुषांपर्यंत अनेकांनी वेळोवेळी दुष्टांचा नायनाट केला, परंतु दुष्ट वृत्ती शिल्लक राहिली. म्हणून माऊली म्हणते, जे खल आहेत, म्हणजे वाईट लोक आहेत, त्यांची व्यंकटी सांडो...व्यंकटी म्हणजे वाईट वृत्ती, तीच 'सांडो'... शब्दांचा किती चपखलपणे वापर केला आहे पहा, 'सांडो' म्हटले आहे, 'जावो' म्हटले नाही. कारण, गेलेली गोष्ट परत येऊ शकते, परंतु सांडलेली गोष्ट पुनर्वापरात आणू शकत नाही. म्हणून खलवृत्ती सांडून गेली, की पुन्हा आचरणात येणार नाही.
एकदा का वाईट वृत्ती नष्ट झाली, तर उरतील फक्त चांगले लोक. जे समष्टीचा विचार करतील, ज्यांच्या ठायी भूतदया असेल, परस्पर प्रेम असेल, सद्भावना असेल, ते केवळ चांगल्या कार्यासाठीच प्रवृत्त होतील, त्यांच्या हातून चांगलीच कामे घडतील आणि या सर्वांच्या प्रयत्नामुळे हे विश्व अतिशय सुंदर होईल. कारण येथील प्रत्येक जीवाला, दुसऱ्या जीवाप्रती सहानुभूती असेल. असे खरोखरच घडले, तर काय होईल, ते पाहू उद्याच्या भागात...!
जय हरी माऊली।
हेही वाचा : Adhik Maas 2020: भगवान विष्णूंना आवडणारी आठ फुले कोणती?; सांगताहेत सुधा मूर्ती