ज्योत्स्ना गाडगीळ
रोज सायंकाळी देवापाशी आणि तुळशीपाशी दिवा लावण्याचा आपल्याकडे प्रघात आहे. हा दिवा देवाच्या गाभाऱ्यात उजेड पडावा म्हणून नाही, तर आपल्या मनातील अंधार दूर व्हावा, यासाठी लावला जातो. अधिक मासात भगवान महाविष्णूंच्या पूजनार्थ दीपदान केले जाते आणि 'अंतरीचा ज्ञानदीप मालवू देऊ नको रे' अशी प्रार्थना केली जाते.
हेही वाचा: Adhik Maas 2020: स्वस्तिक चिन्ह काढा दारी, भगवान विष्णू येतील घरी
दिव्याचे महत्त्व काय आहे?
एक दिवा सहस्त्र दिवे प्रज्वलित करू शकतो. माणसाने दिव्याकडून प्रेरणा घेऊन मी प्रकाशित होईन आणि दुसऱ्यांनाही प्रकाशित करीन. माणसानेही जगातील अंधार हटविण्यासाठी, अज्ञान दूर करण्यासाठी तसेच दैवी विचारांचा प्रकाश पसरविण्यासाटी अखंड जळत राहिले पाहिजे, अशी जीवनदीक्षा दीपक आपल्याला देतो. सतत तेवत्या दिव्याप्रमाणे मनुष्यानेही प्रभूकार्यासाठी सतत प्रकाशित राहिले पाहिजे. श्रीविष्णूंच्या सेवार्थ दीपदान करून आपण आपल्या विहित कार्याचा कायम आठव ठेवला पाहिजे.
दीपदान कसे करावे :
पुराणात दीपदानाचे वर्णन केले आहे. अधिकमासात पहाटे लवकर उठावे. शितल जलाने स्नान करावे. घरातल्या देवांची पूजा करावी. ज्या जागेवर दीपपूजा करायची ती जागा सारवून किंवा स्वच्छ पुसून घ्यावी. त्यावर सुंदरशी रांगोळी काढावी, पाट किंवा चौरंग मांडावा, त्यावर रंगीत वस्त्र अंथरावे, पाट किंवा चौरंगावरील वस्त्रावर यथाशक्ती गहू किंवा तांदळाची रास ठेवावी. त्यावर हळदीकुंकवाची बोटे लावलेला, पाण्याने भरलेला, आम्रपल्लव किंवा विड्यांच्या पानांने सुशोभित केलेला एक कलश त्या धान्याच्या राशीवर ठेवावा. कलशामध्ये विड्याची दोन पाने, सुपारी व एखादे नाणे ठेवावे. कलशावर ताम्हन ठेवून, त्या ताम्हनात तांब्याचा किंवा धातूचा एक दिवा ठेवावा. हा दिवा शक्यतो तुपाचा असावा. कलशापुढे गणेशाची सुपारी मांडवी, शक्य असेल तर त्या कलशासमोर राधा-कृष्णाची प्रतिमा किंवा लक्ष्मीनारायणाची मूर्ती ठेवावी. सोबत उदबत्ती, निरांजन आणि घंटा ठेवावी. उपासकाने शुचिर्भूत होऊन चौरंगासमोरील पाटावर बसावे. कुलदेवतेचे, माता पिता, गुरु यांचे स्मरण करावे, चौरंगाजवळच निरंजन अथवा समई लावून घ्यावी. मग आचमन करून दीपपूजन आणि दीपदानाचा संकल्प करावा. मग श्रीगजाननाचे, कलशाचे, समईचे, घंटेचे पूजन करावे. कलशावरील ताम्हनात जो दीप प्रज्वलित करून ठेवलेला आहे, त्या दीपाची भक्तिभावाने षोडशोपचारे पूजा करावी. अशी पूजा केलेला तो दीप गरजू व्यक्तीला दान करावा. त्यासोबत वस्त्र, पात्र, तेहतीस अनारसे इत्यादी वस्तू द्याव्यात. तसेच मिठाई, तांबूल विडा व दक्षिणा द्यावी. ज्या व्यक्तीला दान देत आहोत, ती व्यक्ती विष्णू-कृष्ण स्वरूप मानून नमस्कार करावा आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावा.
दीपदान करताना म्हणावयाचा श्लोक:
आज्यं च वर्तिसंयुक्तं वन्हिना योजितं मया,दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यतिमिरापह।।
त्रैलोक्याचा अंधार दूर करणाऱ्या हे देवाधिदेवा पुरुषोत्तमा, या दिव्याचा तू स्वीकार कर आणि आमच्या आयुष्यातील अंधार दूर कर.
हेही वाचा: Adhik Maas 2020: अधिक मासात विवाहित मुली भरतात, आईची ओटी