Adhik Maas Shravan Mahina 2023: मराठी वर्षातील महत्त्वाचा आणि व्रत-वैकल्यांची रेलचेल असलेला चातुर्मास सुरू झाला आहे. यंदा चातुर्मास विशेष मानला जात आहे. कारण यावर्षीच्या चातुर्मास महिन्यांत एक महिना अधिक आला आहे. यंदाच्या वर्षी श्रावण महिना अधिक आला आहे. १९ वर्षांनी हा दुर्मिळ योग जुळून आला आहे. त्यामुळे यंदा श्रावणात ८ सोमवार येत आहेत. मात्र, आठही सोमवारी व्रताचरण, उपवास करावे का, असा प्रश्न अनेकांच्या मनात आला आहे. नेमके किती श्रावणी सोमवार करायचे? कधी व्रतोपासना करावी? यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया... (Adhik Maas Sawan 2023)
अधिक मास म्हणजे काय? यंदा अधिक महिना कोणता? कधीपासून सुरू होणार? पाहा, महत्त्व व मान्यता
चातुर्मास सुरू झाल्यानंतर पहिला श्रावण महिना येतो. श्रावण महिना महादेवांना समर्पित असल्याचे सांगितले जाते. भगवान शंकराच्या पूजेसाठी श्रावण विशेष मानला जातो. यावर्षीचा श्रावण खूप खास असल्याचे बोलले जात आहे. नियमित श्रावण महिन्यात ४ किंवा ५ श्रावणी सोमवार येतात. मात्र, यंदाचा श्रावण संपूर्ण दोन महिन्यांचा असणार असून, महादेवाचे पूजन, नामस्मरण, आराधना करण्यासाठी भाविकांना चार नव्हे तर आठ श्रावणी सोमवार मिळणार आहेत. (Adhik Maas Shravan 2023 Dates)
चातुर्मासातील अधिक श्रावण आणि निज श्रावण महिना
सन २०२३ मध्ये मंगळवार, १८ जुलै २०२३ रोजी अधिक श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. तर अधिक श्रावण महिन्याची सांगता बुधवार, १६ ऑगस्ट २०२३ रोजी होणार आहे. तर निज म्हणजेच नियमित श्रावण महिना गुरुवार, १७ ऑगस्ट २०२३ पासून सुरू होत असून, निज श्रावण महिना शुक्रवार, १५ सप्टेंबर २०२३ रोजी संपत आहे. म्हणजेच अधिक आणि निज असे दोन महिने धरल्यास श्रावण महिना ५९ दिवसांचा असेल, असे सांगितले जात आहे. याआधी २००४ या वर्षी म्हणजे १९ वर्षांपूर्वी श्रावण हा अधिक महिना आलेला होता. पुढे २०४२ साली परत श्रावण हा अधिक महिना येईल.
१९ वर्षांनी श्रावणात दुर्मिळ योग; ८ श्रावणी सोमवार येणार, महादेवांच्या महापूजेने शुभच होईल!
अधिक मासात कोणती कामे वर्जित आहेत?
अधिकमासामध्ये काम्यकर्मे वर्ज्य करत, निष्कामकर्मे करावीत असे शास्त्र सांगते. त्याचप्रमाणे अधिक महिन्यात विवाह, उपनयन, उत्सव, कोणत्याही व्रताचे उद्यापन, गृहप्रवेश, वास्तुशांती, प्रथम तीर्थस्नान, प्रथम देवदर्शन, देवांची प्राणप्रतिष्ठा, नवीन कामास प्रारंभ, नारायण-नागबली, त्रिपिंडी श्राद्ध, नवीन कोणतेही पदग्रहण, नवीन वस्त्रे व दागिने धारण करणे यांसारखी कामे वर्ज्य करावीत, असे शास्त्रात सांगितलेले आहे.
यंदा श्रावणात दुर्मिळ योग: ४ एकादशी, २ संकष्टी चतुर्थी; शुभ संयोगात करा व्रताचरण अन् पूजन
श्रावणी सोमवार आठ, पण मुख्य चारच; शास्त्र काय सांगते?
यंदा २०२३ वर्षी श्रावण महिना अधिक महिना आल्यामुळे श्रावणात एकूण आठ सोमवार आलेले आहेत व आठही सोमवार ‘सोमवारचा उपवास‘ करायचा का? असा संभ्रम लोकांमध्ये आहे. परंतु कोणतेही काम्य (कामनेने केले जाणारे) व्रत अधिक महिन्यात करू नये असे शास्त्र असल्यामुळे अधिक महिन्यातील सोमवारी श्रावणी सोमवारचा उपवास करू नये तर अधिक महिन्यानंतर येणाऱ्या निज श्रावणातील सोमवारीच फक्त श्रावणी सोमवारचा उपवास करावा, असे शास्त्र सांगते. (Shravani Somvar 2023 Dates)
महाफलदायी सोळा सोमवारचे व्रत अधिक श्रावणापासून सुरू करायचे की निज श्रावणात ते जाणून घ्या!
निज श्रावणी सोमवार कधी?
अधिक मासानंतर १७ ऑगस्ट २०२३ पासून निज श्रावण सुरू होत असून, तर निज श्रावण महिना शुक्रवार, १५ सप्टेंबर २०२३ रोजी संपत आहे. निज श्रावण महिन्यात श्रावणी सोमवारी केली जाणारी व्रते, उपासना करता येणार आहेत. निज श्रावण महिन्यातील पहिला श्रावणी सोमवार, २१ ऑगस्ट २०२३ रोजी येत आहे. दुसरा श्रावणी सोमवार, २८ ऑगस्ट २०२३ रोजी आहे. तिसरा श्रावणी सोमवार, ०४ सप्टेंबर २०२३ रोजी आहे. तर शेवटचा म्हणजेच चौथा श्रावणी सोमवार, ११ सप्टेंबर २०२३ रोजी आहे.