गेले दोन दिवस आपण भगवान पुरुषोत्तमाकडे माऊलींच्या पसायदानातून वैश्विक प्रार्थना करत आहोत. पसायदानाचा अर्थ समजून घेत आहोत आणि विश्वावर आलेली आपत्ती दूर होऊन सर्व सुखी होवोत, असे मागणे मागत आहोत. माऊलीदेखील हेच मागणे मागतात,
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊनि तिन्ही लोकी,भजिजो आदिपुरुखी अखंडित।।
नुसती कल्पना करा, की या जगात कोणीही दु:खी नाही, सारे काही सुखासुखी सुरू आहे, पशू-पक्ष्यांसह सर्व जीव भयमुक्तपणे वावरत आहेत, ते विश्व किती सुंदर असेल. प्रत्येक जीवात्मा संतुष्ट होऊनच या जगाला निरोप देईल. नवीन जीवाचे आनंदाने स्वागत होईल. हा आनंद देणाऱ्या आदिपुरुषाचा आठव ठेवून सर्व जण आपापले कर्तव्य पार पाडतील. तिथे आपोआपच शांतता, समता, शांती, प्रेम कायम व्यापून राहिल. या गोष्टींचे स्मरण राहावे, म्हणून माऊली म्हणतात,
आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकी इये,दृष्टादृष्ट विजये, होआवे जी।।
हे सर्व चित्र माऊलींनी केवळ कल्पनेच्या आधारावर रेखाटले नाही, तर ते सांगतात, खुद्द भगवान श्रीकृष्णांनी याबाबत सुतोवाच केले आहे. कसे वागावे, कसे वागू नये, आयुष्याचे सार काय, उद्दीष्ट काय, असे सारे काही गीतेत सामावले आहे. त्या ग्रंथाचा आपल्या दैनंदिन आयुष्यात समावेश केला, तर त्यातील विशेष ज्ञान आपल्यालाही अवगत होईल. जगण्याची कला आत्मसात होईल. सर्व भोगावर विजय मिळवून आत्मिक आनंदाची प्राप्ती हाईल. लौकिक भोगापलीकडची दृष्टी ग्रंथातून मिळेल. म्हणून या वाग्यज्ञाचा समारोप करताना माऊली या ग्रंथाच्या सहवासात राहण्याचा उपाय सुचवतात.
येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसावोयेणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला।
ज्ञानदेवांच्या आर्जवी, स्नेहार्द मागणीमुळे त्यांचे गुरु निवृत्तीनाथ आणि स्वयं विश्वेश्वरदेखील प्रसन्न झाले. संपूर्ण प्राणीसृष्टी ईश्वरनिष्ठांच्या सहवासात धन्य होवो, असा अद्भुत प्रसाद माऊलींनी मागितला. त्यांच्यावर कृपादृष्टी ठेवत निवृत्तीनाथ म्हणाले, `ज्ञानदेवा, तुझा वाणीयज्ञ पाहून आणि ऐकून मी प्रसन्न झालो आहे. तुला मी काय देणार, तू तर सर्व प्रकट केले आहे. मी तुला आशीर्वाद देतो, तुझ्या विश्वशांतीच्या, विश्वप्रेमाच्या, विश्वबंधुत्वाच्या सर्व कामना पूर्ण होवो. सगळीकडे सज्जनांच्या वसाहती निर्माण होवोत. जिथे तुझे नाव मनात आणि तनात झंकारत राहील, तिथे फक्त शांती नांदेल, बंधुत्व वाढेल, प्रेम वाढेल. तू जो प्रसाद मागितलास, तो तुला अखंड प्राप्त होवो.'
निवृत्तीनाथांच्या रूपाने साक्षात विश्वेश्वर देवाने माऊलींना आशीर्वाद दिला. आपणही माऊलींप्रमाणे जर मनापासून भगवंताकडे हे वैश्विक दान मागितले, तर आपलीही इच्छा पूर्ण होईल. चला तर मग, आपणही मनापासून भगवंताला साकडे घालूया आणि अधिक मासाला निरोप देत, निज श्रावण अर्थात मुख्य श्रावणाच्या स्वागतासाठी सज्ज होऊया.