१८ जुलै पासून अधिक श्रावण मास (Adhik Maas 2023) सुरू होत आहे, तो १७ ऑगस्ट रोजी संपून निज श्रावण अर्थात मुख्य श्रावण सुरू होणार आहे. या अधिक मासाला पुरुषोत्तम मास असे म्हणतात. या महिन्यात विष्णू भक्ती केल्यास अधिक पुण्य प्राप्त होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यात उपासना म्हणून महिनाभर रोज सकाळी न चुकता विष्णू सहस्त्र नाम ऐकून दिवसाची प्रसन्न सुरुवात करता येईल शिवाय विष्णू स्तुती कानावर पडून महिनाभर श्रवण भक्ती सहज होऊ शकेल.
विष्णू सहस्त्र नाम हे स्तोत्र अत्यंत प्रभावी आहे. ते नुसते म्हणून उपयोग नाही तर त्याचे अचूक उच्चार होणे महत्त्वाचे आहे. म्हणून महिनाभर हा श्रवणानंद घेण्यासाठी लेखात नाव सुचवले आहे, ते म्हणजे दिवंगत गायिका सुब्बालक्ष्मी यांचे!
एम. एस. सुब्बालक्ष्मी यांचे नाव आपण अनेक वर्षांपासून ऐकत आहोत. केवळ शास्त्रीय गायनात नव्हे तर त्यांनी अध्यात्मात स्तोत्रपठण करून सिंहाचा वाटा उचलला आहे. म्हणून आजही अनेक घरात सकाळची सुरुवात त्यांनी गायलेल्या 'व्यंकटेश सुप्रभातम' या स्तोत्राने होते. अधिक मासात आपल्या नित्य उपासनेला जोड द्यायची आहे ती विष्णू सहस्त्र नाम ऐकण्याची. मोजून २८ मिनिटात हे स्तोत्र ऐकून पूर्ण होते. त्यामुळे सकाळी आपले आवरून कामासाठी बाहेर पडताना हे स्तोत्र आरामात ऐकून होईल. युट्युबवर या स्तोत्राची लिंक सहज उपलब्ध आहे.
अधिक मासात हेच स्तोत्र का? जाणून घ्या फायदे :
>> आर्थिक, वैवाहिक, सामाजिक, राजकीय प्रश्नांतून मार्ग मिळतो.
>> गर्भधारणेसंबंधी समस्या दूर होतात. गर्भसंस्काराच्या वेळी स्तोत्र ऐकले असता, बालकावर चांगले संस्कार होतात.
>> ग्रहदशा कुठलीही असो, विष्णुसहस्रनामाचे पठण केल्यामुळे मन:शांती लाभते, भय कमी होते आणि संकटावर मात करण्याचे बळ मिळते.
>> मुलांचे अभ्यासात मन लागत नसेल, घरात वादविवाद होत असतील, तर विष्णुसहस्रनामाचे सामुहिक पठण करावे. निश्चित लाभ होतो.
विष्णुसहस्रनामाचे पठण कसे व कधी करावे?
>> हे स्तोत्र नित्य उपासनेत म्हटल्यास अधिक फायदे होतात. पण एरव्ही शक्य झाले नसेल तर निदान अधिक मासात हे स्तोत्र आवर्जून ऐकावे.
>> अधिक मासात १०८ वेळा हे स्तोत्र म्हणण्याचा संकल्प केल्यास, अधिक लाभ होतो असा भाविकांना अनुभव आला आहे.
>> सत्यनारायण पूजेत विष्णुसहस्रनाम घेतले जाते. म्हणून अधिक मासात अनेक ठिकाणी सत्यनाराण पूजेचे आयोजन केले जाते.
असे हे मंगलकारी स्तोत्र तुम्हीसुद्धा ऐका आणि त्याचे होणारे लाभ अनुभवा.