आपण सगळे रोजच देवाची पूजा करतो. शास्त्रसंगीत पूजा करण्याइतका जरी वेळ नसला, तरी देवाला स्नान, गंध, अक्षता, फुलं, धूप, दीप एवढा सोपस्कार आपण पार पाडतो. काही जण देवाला नुसती निर्माल्याची फुलं काढून ताजी फुलं वापरली जातात. पण विचार करा, एक दिवस आपण अंघोळ न करता नुसता परफ्युम मारून बाहेर गेलो तर? अंघोळ न केल्याची जाणीव दिवसभर मनात राहील. कपड्यांना सुगंध येईल, पण शरीराचे काय? त्याचीही स्वच्छता हवीच! मग जे आपल्याला आवडते, ते देवालाही आवडत असणारच ना! त्याच भावनेतून देवाला रोज स्नान घालून पूजा अर्चा केली जाते.
या देवस्नानाबाबतीतही अनेकांना प्रश्न पडतो, की देवपूजा करण्यासाठी पाणी कोणतं घ्यावं? किंवा अधिक मास तसेच विशिष्ट सण वारी पूजा करताना झाकणबंद घड्यातलं गंगा जल वापरावं का? ते किती जुने असले तर चालते? त्याचा वापर कधी करावा? इ. शंकांचे निरसन करत आहेत आळंदीचे समीर तुर्की.
पूजा करताना पाणी कोणते वापरावे असे विचार असाल, तर अगदी मूळ नियमांप्रमाणे सोवळ्यात पाणी भरून आणून मग पूजा - अभिषेक करायला हवा. अगदीच नियमांवर बोट ठेवायचं म्हटलं तर नळाचे पाणी सुद्धा पूजेसाठी चालणार नाही असं आहे. पण दैनंदिन आयुष्यात आपल्याला ते शक्य नाही.
दुर्दैवाने शुद्ध जलस्रोत आता जवळजवळ नष्ट भ्रष्ट झाल्यात जमा आहेत. ओढ्यानालयांची गटारे झाली आहेत. नद्यांच्या प्रदूषणाने सर्व रेकॉर्ड्स मोडून काढली आहेत. कित्येक ठिकाणी अगदी विहिरींना सुद्धा केमिकल्सच पाणी येऊ लागलं आहे.. एकूणच आपण हतबल आहोत. त्यामुळे कालानुरूप बदल अपरिहार्य आहे.
अशा वेळी उपलब्ध असलेल्या पाण्यापैकी जे "सर्वात स्वच्छ आणि पिण्यायोग्य पाणी" असेल ते कलश किंवा पूजेच्या गडूमध्ये भरून घ्यावं. त्याआधी आपण शुचिर्भूत अर्थात स्नान करून स्वच्छ व्हावं. त्यानंतर इथे तिथे होणारे स्पर्श टाळून आधी पूजा करून घ्यावी. स्वच्छ पाण्याने देवांना अभिषेक करावा. घंटा वाजवावी. दिवा लावून उदबत्ती लावावी. हळद, कुंकू, अष्टगंध उगाळून लावावे.
'हे' पाणी वापरू नये!
अशुद्ध, कसलासा वास येणारं, रंगीबेरंगी, तवंग येणारं पाणी चुकूनही देवपूजा करण्यासाठी घेऊ नये. ज्यांना शक्य असेल त्यांनी मात्र नियम पाळण्याचा यत्न अवश्य करावा. सागरजल तथा गंगाजल सर्वश्रेष्ठ आहे, त्यानंतर क्रमशः सप्तनद्या, महानद्या, नद्या, तीर्थक्षेत्रांमधून आणलेलं पाणी, पुष्करीणी, कुंड, तलाव, ओढा, झरा, विहिरी आणि कूपनलिका असा क्रम जलाच्या पावित्र्याबाबत समजला जातो. ज्यांना शक्य असेल त्यांनी सरळ पावसाचे पाणी भरून ठेवून वापरावे. थोडं विचित्र वाटेल कदाचित पण पावसाच्या पाण्यात अनेक चमत्कारिक गुणधर्म असतात. बागकाम करणाऱ्या कोणालाही ह्याचा अनुभव असेलच. त्यामुळे देवपूजेसाठीही तेच पाणी चांगले म्हणता येईल.