Adhik Maas Sankashti Chaturthi 2023: चातुर्मास काळ सुरू आहे. चातुर्मासातील अधिक मास सुरू आहे. श्रावण अधिक मासात एकादशी, पौर्णिमा झाल्यानंतर आता अधिक महिन्यातील संकष्ट चतुर्थी आहे. अडीच ते तीन वर्षांनी येणारा अधिक महिना हा धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जातो. अधिक महिन्यात केली जाणारी व्रत-वैकल्ये, पूजा-अर्चा, नामस्मरण, आराधना उपासना अधिक शुभ पुण्यफलदायी मानली जाते. अधिक महिन्यात येणारी संकष्ट चतुर्थी विशेष महत्त्वाची मानली जाते. श्रावण अधिक महिन्यातील संकष्ट चतुर्थीचे महत्त्व, विविध शहरांतील चंद्रोदय वेळ, व्रतपूजन विधी आणि मान्यतांबाबत जाणून घेऊया... (Adhik Maas Sankashti Chaturthi 2023 Significance)
तीन वर्षांनी अधिक मास येतो. त्यामुळे अधिक मासातील संकष्ट चतुर्थीला विशेष महत्त्व प्राप्त होते, असे म्हटले जाते. हा एक अद्भूत योग मानला जाते. चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी आषाढ महिन्यात होती. यानंतर आता अधिक महिन्यातील संकष्ट चतुर्थीचे व्रत मोठ्या भक्तिभावाने केले जाणार आहे. संकष्ट चतुर्थी व्रत करण्याची प्राचीन परंपरा सुरू आहे. प्रत्येक संकष्टीला गणेशभक्त आपापल्या परिने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत-पूजत असतात. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. कोट्यवधी गणेश भक्त या दिवशी उपवास करतात. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो, अशी मान्यता आहे. मात्र, चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपास सोडू नये, असे म्हटले जाते. (Adhik Maas Sankashti Chaturthi 2023 Shubh Muhurat)
अधिक श्रावण संकष्ट चतुर्थी: शुक्रवार, ०४ ऑगस्ट २०२३
अधिक श्रावण संकष्ट चतुर्थी प्रारंभ: शुक्रवार, ०४ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी १२ वाजून ४५ मिनिटे.
अधिक श्रावण संकष्ट चतुर्थी सांगता: शनिवार, ०५ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ०९ वाजून ४० मिनिटे.
भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची परंपरा आहे. संकष्ट चतुर्थी व्रत प्रदोष काळी केले जाते. तसेच यामध्ये चंद्रोदय आणि चंद्रदर्शन महत्त्वाचे असल्यामुळे आषाढ महिन्यातील संकष्ट चतुर्थीचे व्रताचरण आणि पूजन शुक्रवार, ०४ ऑगस्ट २०२३ रोजी करावे, असे सांगितले जात आहे. प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध आणि वद्य पक्षात येणारी चतुर्थी गणपती बाप्पाला समर्पित आहे. पैकी वद्य चतुर्थी संकष्ट चतुर्थी नावाने ओळखली जाते. सामान्यपणे वर्षभरात १२ संकष्ट चतुर्थी येतात. मात्र, यंदा श्रावण अधिक असल्यामुळे या वर्षातील संकष्ट चतुर्थींची संख्या १३ झाली आहे. यामुळे १३ संकष्ट चतुर्थी व्रतांचे पुण्य मिळू शकेल. अधिक महिन्यात केलेल्या पूजनाचे पुण्यफल दसपटीने मिळते, अशी मान्यता आहे. अधिक महिन्यातील संकष्ट चतुर्थी गणपती उपासकांसाठी विशेष महत्त्वाची मानली गेली आहे. तसेच संकष्ट चतुर्थी शुक्रवारी येत आहे. श्रावण अधिक असल्यामुळे गणपती बाप्पासह महादेव शिवशंकर आणि पुरुषोत्तम मास असल्यामुळे श्रीविष्णू आणि महालक्ष्मीचे पूजन, नामस्मरण, जप अधिक शुभ पुण्यफलदायी मानले गेले आहे. (Adhik Maas Sankashti Chaturthi 2023 Vrat Puja Vidhi)
गणपती बाप्पाच्या व्रत पूजनाची सोपी पद्धत
संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. दिवसभर उपवास करावा. गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करतेवेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. यानंतर फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नेवैद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे. यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि धूप, दीप लावून गणपती बाप्पाला आणि चंद्राला महानैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दूर्वा वाहून उपवास सोडावा. चंद्रदर्शन हा या व्रतातील महत्त्वाचा भाग आहे. पूजेनंतर गणपती स्तोत्र पठण, गणपतीचे नामस्मरण, गणपती मंत्राचा जप करावा, असे सांगितले जाते. संकष्टीच्या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदाचे फुल आणि दुर्वांची जुडी अर्पण करतो. कारण या दोन्ही गोष्टी बाप्पाला प्रिय आहेत. एखादी दुर्वा अर्पण केली, तरी पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होते. परंतु या दोन्ही गोष्टी उपलब्ध नसतील तर एकवेळ हात जोडून मनोभावे नमस्कार करावा.
विविध शहरांतील चंद्रोदय वेळ
शहरांची नावे | चंद्रोदयाची वेळ |
मुंबई | रात्रौ ०९ वाजून ३२ मिनिटे |
ठाणे | रात्रौ ०९ वाजून ३१ मिनिटे |
पुणे | रात्रौ ०९ वाजून २७ मिनिटे |
रत्नागिरी | रात्रौ ०९ वाजून २९ मिनिटे |
कोल्हापूर | रात्रौ ०९ वाजून २५ मिनिटे |
सातारा | रात्रौ ०९ वाजून २६ मिनिटे |
नाशिक | रात्रौ ०९ वाजून २८ मिनिटे |
अहमदनगर | रात्रौ ०९ वाजून २४ मिनिटे |
धुळे | रात्रौ ०९ वाजून २५ मिनिटे |
जळगाव | रात्रौ ०९ वाजून २१ मिनिटे |
वर्धा | रात्रौ ०९ वाजून ०९ मिनिटे |
यवतमाळ | रात्रौ ०९ वाजून ११ मिनिटे |
बीड | रात्रौ ०९ वाजून २० मिनिटे |
सांगली | रात्रौ ०९ वाजून २४ मिनिटे |
सावंतवाडी | रात्रौ ०९ वाजून २६ मिनिटे |
सोलापूर | रात्रौ ०९ वाजून १८ मिनिटे |
नागपूर | रात्रौ ०९ वाजून ०७ मिनिटे |
अमरावती | रात्रौ ०९ वाजून १२ मिनिटे |
अकोला | रात्रौ ०९ वाजून १५ मिनिटे |
औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) | रात्रौ ०९ वाजून २२ मिनिटे |
भुसावळ | रात्रौ ०९ वाजता २१ मिनिटे |
परभणी | रात्रौ ०९ वाजून १६ मिनिटे |
नांदेड | रात्रौ ०९ वाजून १३ मिनिटे |
धाराशीव | रात्रौ ०९ वाजून १८ मिनिटे |
भंडारा | रात्रौ ०९ वाजून ०५ मिनिटे |
चंद्रपूर | रात्रौ ०९ वाजून ०६ मिनिटे |
बुलढाणा | रात्रौ ०९ वाजून १९ मिनिटे |
मालवण | रात्रौ ०९ वाजून २८ मिनिटे |
पणजी | रात्रौ ०९ वाजून २६ मिनिटे |
बेळगाव | रात्रौ ०९ वाजून २४ मिनिटे |
इंदौर | रात्रौ ०९ वाजून २१ मिनिटे |
ग्वाल्हेर | रात्रौ ०९ वाजून १३ मिनिटे |